स्थैर्य, फलटण : सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला असून हा बालेकिल्ला उभारण्यात फलटणकरांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे ना.निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय सहभाह घेत पक्षवाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणारे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्टींनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी मागणी माण तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
बाळासाहेब शिंदे म्हणाले, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कल्पक नेतृत्वाने जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवली आहे. तर फलटण तालुक्याच्या राजकारणात त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे कार्यरत राहिले. श्रीमंत रामराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत संजीवराजे यांनी फलटण तालुक्यात ग्रामपंचायतीपासुन ते विधानसभेपर्यंत राष्ट्रवादीकडे एक हाती सत्ता ठेवली आहे. फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव असल्याने आजपर्यंत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना संधी मिळाली नाही.त्यांनीही आपल्या नेतृत्वाची चुणूक तालुक्यासह जिल्ह्यात दाखवून दिली आहे.
जिल्हा परिषदेचा कारभार पाहताना त्यांनी विविध योजना राबवत लोकाभिमुख कारभार करून दाखवला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रबळ उमेदवार असताना त्यांना डावलून दुसर्यांना उमेदवारी देण्यात आली. जर त्यावेळी श्रीमंत संजीवराजेंना उमेदवारी दिली असती तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचा झेंडा फडकलाच नसता. फलटण तालुक्यात विरोधकांना जसे वर्षानुवर्षे सत्तेपासून दूर ठेवले आहेत तसेच श्रीमंत संजीवराजेंनी लोकसभेतही विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवत प्रचंड मताधिक्याने निवडून आले असते.
श्रीमंत संजीवराजे यांचे कर्तृत्व व नेतृत्व सर्व जिल्ह्याला माहित असून अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाला विधानपरिषदेवर घेऊन संधी दिली तर जिल्ह्यात पक्षाची अजून चांगली बांधणी होईल. निंबाळकर घराण्याचे माण तालुक्यात चांगले संबंध असून त्याठिकाणीही या संधीचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुप्रिमो खासदार शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटिल, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी श्रीमंत संजीवराजे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी अशी मागणी माण तालुका राष्ट्रवादीच्यावतीने करण्यात आलेली आहे.