दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण येथील दै. महामित्रचे संपादक व महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्री. दशरथ फुले यांच्यासह नागरिकांनी राज्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घेण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे अर्जाद्वारे केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाला केलेल्या अर्जात फुले यांनी म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून न घेतल्याने त्यांच्यावर प्रशासकीय राजवट लादली गेली आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासास मोठी खिळ बसली आहे. प्रशासकामुळे एकाधिकारशाही वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक प्रश्नांसाठी मोठ्या समस्येस तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात.
या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारचे धोरण, ओबीसी आरक्षण तसेच प्रभाग रचना या मुद्यावर न्यायालयात अडकून पडल्या आहेत. अशा प्रकारची वेळ स्वातंत्र्यापासून राज्यात कधीही निर्माण झाली नव्हती.
प्रशासकीय राजवटीमुळे या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. जनता या संस्थांमध्ये निवडून जाणार्या लोकप्रतिनिधींमार्फत आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न सोडवून घेत असतात; परंतु गेल्या दोन वर्षांपासून या संस्थांवर प्रशासक असल्याने नागरिकांना कोणीही वाली राहिला नाही. यामुळे लोकशाहीला काळीमा फासल्याची परिस्थिती आज राज्यात निर्माण झाली आहे.
शासनाने न्यायालयात लवकरात लवकर या संस्थांच्या निवडणुकांचा प्रश्न सोडवून त्वरित निवडणुका घ्याव्यात, अन्यथा आम्हास जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही दशरथ फुले यांनी दिला आहे.
या अर्जावर दशरथ फुले यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या असून हा अर्ज केंद्रीय निवडणूक आयोग, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकार्यांनाही देण्यात आला आहे.