स्थैर्य, फलटण, दि. ३१ : फलटण तालुक्यातील नांदल येथे एका खाणीमध्ये बेकायदेशीररीत्या लावण्यात आलेल्या सुरुंगात घाडगेवाडी – मुळीकवाडी येथील बहुतांश घरांचे नुकसान झालेले आहे. सदरील खाण चालकावर व मालकावावर बेकायदेशीररीत्या सुरुंग लावल्या प्रकरणी व बेकायदेशीररीत्या खाण सुरु ठेवल्याप्रकरणी त्वरित कारवाई करावी अशी मागणी तेथील नागरिकांमधून होत आहे.
सदर क्रशरच्या खाणपट्ट्याची मुदत जून महिन्यातच संपली असून तेथे घडविण्यात आलेला सुरूंगाचा स्फोट हा बेकायदेशीर होता हे समोर आले. विनापरवानगी करण्यात आलेल्या या स्फोटाची माहिती महसूल विभागास व पोलीस ठाण्यात नागरिकांनी दिल्यानंतर, महसूल विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व झालेल्या घटनेची माहिती घेऊन स्थळ पंचनामा केला. स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण जास्त असल्याने या परिसरातील गावकर्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते.
या बाबत अधिक माहिती अशी कि, दिलिप महादू राउत यांच्या फलटण-सातारा रस्त्यावरील नांदल गावच्या हद्दीतील प्रसाद स्टोन क्रशर या खाणीत दि. २८ रोजी रात्री सातच्या सुमारास सुरुंगाचा स्फोट करण्यात आला. या स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने परिसरातील रामोसंवाडी, पिसाळवस्ती, नांदल, मुळीकवाडी खडकी-मलवडी, घाडगेवाडी व लगतच्या वाड्या वस्त्यांवर हादरे बसून घरांना मोठ्या प्रमाणावर तडे गेले. तसेच स्फोटाच्या आवाजाने नागरिक भयभयीत होवून घरातून बाहेर पडले. या नंतर सदर स्फोट राऊत यांच्या खाणीत झाल्याचे समजताच गावकर्यांनी तेथे जमायला सुरुवात केली. लोक जमू लागताच तेथील कामगारांनी पळ काढला.
फलटण सातारा जिल्हामार्ग लगतच भूमापन क्र 593 मधील 1 हेक्टर 87 आर जागेत 5 वर्षासाठी दिलीप महादू राऊत यांच्या नावे असणाऱ्या या प्रसाद स्टोन क्रशरला जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडून ३० जून २०१५ रोजी खानपट्टा मंजुरी देण्यात आली होती. २९ जून २०२० रोजी खानपट्ट मुदत संपली असतानाही या ठिकाणी नियमबाह्यपणे जिल्हाधिकारी कार्यालय अथवा तहसीलदार कार्यालय या सक्षम कार्यालयांची सुरुंग लावण्याची परवानगी न घेता सुरूंग लावण्यात आला. मुळात फलटण सातारा जिल्हामार्ग असताना या जिल्हामार्गाच्या लगतच्या भूमापन क्र. ५९३ मधील खाणीस खानपट्टा मंजूर करण्यात आला. नियमाप्रमाणे जिल्हा मार्गालगत खाणीस परवानगी देता येत नसताना २०१५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिली होती.
या नियमबाह्यपणे देण्यात आलेल्या परवानगीमुळे पाच वर्ष या ठिकाणी खाण सुरू होती. मुदत संपूनही महसूल विभागाच्या मदतीने याठिकाणी मनमानीपणे शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून खाण सुरूच होती. त्यामुळे या क्रशरला कोणकोणत्या अधिकाऱ्यांचे पाठबळ होते हे समोर येणे आवश्यक आहे. आजअखेर करण्यात आलेल्या खानपट्टा क्षेत्राचे मोजमाप पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता असून खानपट्टा संपला असताना क्रशर सुरू कसा होता ? जिल्हामार्ग असताना नूतनीकरण देण्याच्या प्रक्रियेत कोण कोणी मदत केली ? शासनास भरण्यात आलेली रॉयल्टी व उपसा करण्यात आलेले गौनखनिज यातील तफावत ? वनविभागाच्या जागेत करण्यात आलेले अतिक्रमण ? या व अशा अनेक बाबीची चौकशी करण्याची गरज असून येणाऱ्या काळात हा नियमबाह्यपणे या क्रशरला जिल्हाधिकारी शेखर सिंह पुन्हा खानपट्टा देणार का ? व नियमबाह्यपणे करण्यात आलेल्या सुरुंग स्फोट प्रकरणी खाण मालक व त्यास पाठबळ देणार्या अधिकार्यांवर कारवाई होणार का असा सवाल परिसरातून व्यक्त होत आहे.