दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत्या काही दिवसात मार्गस्थ होत आहे. पालखी सोहळ्यामध्ये वारकरी भावीकांसाठी पालखी तळावर लावण्यात येणारे किराणा व जिवनावश्यक वस्तुंचे स्टॉलमुळे कोणत्याही परिस्थितीत वाहतूकीस व पालखी तळावर दर्शनासाठी येणार्या भाविकांना अडथळा होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश सहकारमंत्री तथा सातारचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी दिले.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आषाढी वारीच्या निमित्ताने सोहळ्याचा फलटण शहरात दोन दिवस व तालुक्यात एकूण चार दिवस मुक्काम असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांननी सातारा जिल्ह्यातील पालखी तळ, सकाळची न्याहरी, दुपारचा विसावा व तेथील असणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली. वीज पाणी रस्ते आरोग्य वगैरे सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. यावेळी ना. बाळासाहेब पाटील यांच्या समवेत आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आधिकारी तथा प्रशासक विनय गौडा, फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, वीज, आरोग्य, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद व सहकार खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
तरडगाव येथे चांदोबाचा लिंब येथील उभ्या रिंगणाचे ठिकाण व तरडगाव गावातून पालखी तळाकडे जाणारा पालखी मार्ग व पालखी तळाची पाहणी केल्यानंतर तेथील वीज पाणी आरोग्य सुविधा पालखी ठेवण्याचा ओटा व पालखी तळालगत उभारण्यात येत असलेल्या स्नानगृह व स्वच्छतागृहाविषयी माहिती सरपंच सौ. जयश्री चव्हाण, उपसरपंच प्रशांत गायकवाड ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांकडून घेतल्यानंतर याबाबी वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना ना. बाळासाहेब पाटील यांनी संबंधित यंत्रणेस दिल्या.
फलटण येथील पालखी तळावर असलेली संपुर्ण व्यवस्था पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडून नगरपालीकेने खास तयार केलेल्या नकाशाद्वारे समजावून घेतली. विशेषतः सोहळ्यातील रथा पुढील व रथा मागील दिंड्या, पालखी ठेवण्याची जागा, सुरक्षा विषयक व्यवस्था, पालखी तळावरील वीज पाणी आरोग्य सुविधा या सर्व बाबींची बारकाईने माहिती घेवून कोणत्याही प्रकारे वारकर्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना केल्या.
गेल्या दोन वर्षांनंतर कोरोनाच्यि प्रादुर्भावामुळे पालखी सोहळा काढला गेला नाही. या वर्षी वारकरी भावीकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवुन त्यानुसार संपुर्ण नियोजन करण्याच्या सुचना देतानाच राज्याच्या अन्य भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी आळंदी-पंढरपूर व सोहळ्याच्या मार्गावर कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा नसला तरी शासन व प्रशासन त्याबाबत दक्ष आसून वैद्यकीय यंत्रणेला स्पष्ट सुचनना देण्यात आल्या आहेत. वारकरी भावीक व अन्य घटकांनी त्या बाबत योग्य काळजी घेवून शासन व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
पालखी सोहळा मुक्काम दोन दिवस असल्याने स्वच्छतागृहाची व्यवस्था व सोहळ्याचे प्रस्थान झाल्यावर पालखी तळ व परिसराची स्वच्छता याविषयी करण्यात आलेल्या नियोजणाची माहिती घेवून त्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यावेळी केल्या.
तरडगाव येथे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्या निवासस्थानी ना. बाळासाहेब पाटील यांनी दौऱ्यादरम्यान सदिच्छा भेट दिली. यावेळी तालुक्यातील विविध विषयांवर पत्रकारांशी वार्तालाप केला. ना. बाळासाहेब पाटील व आमदार दीपक चव्हाण यांच्यामध्ये फलटण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा झाली.
यावेळी फलटण येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या “जय – व्हिला” या निवासस्थानी सहकार मंत्री तथा सातारचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांची उपस्थिती होती. यावेळी ना. बाळासाहेब पाटील व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.
विधानपरिषद निवडणुकीबाबत पक्षश्रेष्ठीच बोलतील : ना. बाळासाहेब पाटील
राज्यामध्ये नुकत्याच राज्यसभा निवडणुका संपन्न झाल्या व आगामी काही दिवसांत विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याबाबत ना. बाळासाहेब पाटील यांना छेडले असता विधानपरिषद निवडणुकीबाबत आमचे नेते उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील हेच बोलतील. मी त्याबाबत बोलणे उचित नाही, असे यावेळी ना. बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.