स्थैर्य, सातारा, दि. 18 : पुणे येथून सातार्यात आणल्या गेलेल्या बायोमेडिकल वेेस्टबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यामार्फत आठ दिवसात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना आपण दिले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दिली.
चार दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेने पुण्यातील बायोमेडिकल वेस्ट सातार्यात आणल्याची घटना घडल्यानंतर सातारा नगरपालिकेवर चौफेर टीका होत होती. भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती तर नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी या घटनेसाठी सातारा पालिका प्रशासनाला जबाबदार धरले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद डी.जी. बनकर, सुनील काटकर यांनी आज गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सौ. कदम यांनी ना. शंभूराज देसाई यांना सातारा येथे बायोमेडिकल वेस्ट आणणार्यांवर कडक कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती.
सातारा विकास आघाडीच्या पदाधिकार्यांशी चर्चा झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ना. शंभूराज देसाई म्हणाले, सातारा पालिकेची परवानगी न घेता पुणे महानगरपालिकेने सातारा येथे बायोमेडिकल वेस्ट अनाधिकाराने आणून टाकले असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. दोन दिवसापूर्वीच या घटनेबाबत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दूरध्वनीवरून माझ्याशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती. सातार्यात टाकण्यात आलेल्या बायोमेडिकल वेस्टबाबत आठ दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश मी आत्ताच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देत आहे. उद्या शुक्रवारी एका बैठकी निमित्त शेखर सिंह यांची भेट होणार असून त्यावेळी राज्य सरकारची परवानगी असल्याशिवाय इतर जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्ट सातारा जिल्ह्यात येऊन देऊ नका अशा सूचना मी त्यांना करणार असल्याचे ना. देसाई यांनी सांगितले.