दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
टाकळवाडे (ता. फलटण) येथील टाकळवाडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पोपट मिंड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
टाकळवाडे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रघुनाथ भोसले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची सोसायटीच्या कार्यालयामध्ये अध्यासी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. साळुंखे यांनी बैठक बोलावली होती. चेअरमन पदासाठी पोपट मिंड यांनी अर्ज दाखल केला. सूचक म्हणून सोसायटीचे ज्येष्ठ संचालक पोपट इवरे व अनुमोदक म्हणून प्रकाश मिंड यांनी सह्या केल्या. चेअरमन पदासाठी पोपट मिंड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. साळुंखे यांनी पोपट मिंड यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. चेअरमन निवडीसाठी संस्थेचे सचिव संदीप कदम, लिपिक दत्तात्रय गावडे, सतीश इवरे, नानासो फाळके यांनी सहकार्य केले.
चेअरमन निवडीनंतर बोलताना पोपट मिंड म्हणाले, टाकळवाडे सोसायटी तालुक्यातील अग्रगण्य सोसायटींपैकी एक आहे. माजी पं. स. सदस्य पोपट इवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालकांना विश्वासात घेऊन सोसायटीचा कारभार सभासदाभिमुख, पारदर्शक व अत्यंत काटकसरीने करून संस्थेचा नावलौकिक अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करू.
चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल पोपट मिंड यांचे शिवसेना तालुकाप्रमुख नानासो इवरे, व्हा.चेअरमन अजित मिंड, सर्व संचालक, फलटण तालुका मराठी पत्रकार संघ, ग्रामस्थ, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.