स्थैर्य, सांगली, दि. 21 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीत करावयाच्या उपाययोजनांमधील सामाजिक संघटनांच्या सहभागाबाबत सामाजिक संघटनांसोबत बैठक घ्या. पूरनियंत्रणासाठी आराखडे तयार करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे सांगून यावर्षीही पावसाचे प्रमाण चांगलेच रहाणार असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
सांगली जिल्ह्याची पूर आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत गुडेवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गतवर्षी प्रमाणेच चांगला पाऊस असल्याने सर्व यंत्रणांनी संपूर्ण तयारीसह सतर्क रहावे, असे निर्देशित करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कृष्णा खोऱ्यातील पाणी टंचाईग्रस्त भागाकडे वळविण्यासाठी मेकॅनिझम उभा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पूरकाळात बोटींचा वापर कमीत कमी केला जावा यासाठी पूर्वीच पूरप्रवण क्षेत्रातील लोकांचे स्थलांतरण व्हावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात यावी.
वेळोवेळी पाणीपातळीत होत असलेल्या बदलांबाबत नदीकाठच्या गावांना अवगत करण्यासाठी यंत्रणा सक्षम ठेवावी, असे सांगितले. बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यामध्ये प्रत्येक गावात ग्राम आपत्ती व्यवस्थापन दल, स्थापन करण्यात आले असून त्यांना आवश्यक किट देण्यात आले आहेत. एनडीआरएफ मार्फत प्रत्येक तालुक्यात संबंधितांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पूरप्रवण क्षेत्रात पाणीपातळी निहाय आराखडा तयार करण्यात आला असून आवश्यकता भासल्यास जनावरांच्या छावणीचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. १५ जुलै पासून एनडीआरएफच्या बोटी आणि जवानांचे पथक जिल्ह्यात दाखल होणार असल्याबाबत माहिती दिली.