दैनिक स्थैर्य । दि. ०४ फेब्रुवारी २०२३ । पुणे । छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची वाढ आणि रक्षण करण्यासाठी अनेक शूरवीरांनी जीवाची बाजी लावून लढा दिला. त्यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम म्हणजे स्वराज्याच्या इतिहासाचे सोनेरी पान आहे. तानाजी मालुसरे यांचा जन्म १६२६ मध्ये जावळी येथे झाला. शरीराने धिप्पाड, धाडसीबाणा असलेले तानाजी स्वराज्याच्या लढाईत सुरवातीपासूनच होते. पुरंदरच्या तहात मोगंलाना दिलेले २३ किल्ले त्यात कोंढाणा हा भक्कम तटबंदीचा किल्ला होता. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी कोंढाण्यासारखा बळकट किल्ला स्वराज्यात असावा अशी इच्छा व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा भेटीनंतर ते राजगडावर आले. त्यांनी तहात दिलेले किल्ले परत घेण्याची मोहीम उघडली. तहात दिलेल्या पैकीच हा कोंढाणा किल्ला. तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराज चांगले मित्रही होते. तानाजीचे धाडस आणि पराक्रम राजांना माहीत होता. कोंढाण्याची जबाबदारी कोणावर सोपवायची यावर चर्चा झाली त्यावेळी आपसूक नाव पुढे आले तानाजी मालुसरे. या मोहीमेची जबाबदारी नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वीकारली.
तानाजी मालुसरे यांचा जन्म सतराव्या शतकात कोकणात महाडजवळ उमरठे येथे १६२६ रोजी झाला होता.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गोडवली येथे बालपण गेले. अफजल खानाच्या स्वारीच्यावेळी शिवाजी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी पाच हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजीने यावेळी महत्वाची कामगिरी बजावली होती. सिहंगड च्या लढाई शिवाय तानाजीने अनेक लढाया केल्या होत्या. संगमेश्वरचे युद्ध ही लोकांना अपरिचित आहे.
संगमेश्वरच्या लढाईत शिवाजी महाराजांचे सैन्य अपुरे होते. आदिलशाहाच्या आदेशावरुन सुर्याजी सुर्वे यांने मावळ्यांना घेरले. पिलाजी निळकंठराव नेतृत्व करीत होते. तो घाबरुन पळून जाऊ लागला. तानाजी मालुसरे पिलाजीचा सहकारी होता. त्यांनी पिलाजीला अडवून असे पळून जाणे योग्य नाही. त्याला तानाजीने दोरखंडने खांबाला बांधून स्वतः सैन्याचे नेतृत्व केले.
तानाजी व सोबतच्या मावळ्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढविला शत्रूनेही तानाजीला रोखण्याचा प्रयत्न केला. दोन्ही सैन्य ऐकमेकांना भिडणार एवढ्यात मराठी सैन्याच्या मागच्या तुकडीने समोरच्यावर हल्ला केला. जखमी झालेल्या शत्रू सैन्याला तानाजी सोबतचे मावळे कापून काढीत. शत्रूशी रात्रभर झुंज सुरु होती. हातपाय कापलेले मुंडके धडावेगळे केलेले शवाचे ढीग पडले होते. सुर्याजीला या युद्धात नुकसान सोसावे लागले. शत्रूसैन्याने पळ काढला. मावळ्यांचा विजय झाला. या युद्धाचे वर्णन शिवभारतात आहे.
कोंढाण्याची लढाई
स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना दिली होती. जेव्हा तानाजी मालुसरे यांना जबाबदारी समजली तेव्हा मुलगा रायबाच्या लग्नाची तयारी सुरु होती. ती तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी प्राधान्य देवून कोंढाणा ताब्यात घेण्याचा निर्धार त्यांनी केला. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे हे शब्द इतिहासात अजरामर झाले. चौक्या पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्तात असलेला हा किल्ला उदयभान राठोडच्या ताब्यात होता. तो पराक्रमी होता. त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला. शत्रुच्या ध्यानी मनी नसणारा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्ल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजीने गडाच्या मागच्या बाजूने मावळ्यांसोबत गड चढला. घोरपडीच्या साह्याने गड चढल्याची दंतकथा सांगितली जाते. अचानक हल्ला करुन तेथील सैन्याला कात्रीत पकडले. अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करुन त्यांनी किल्ला जिंकला. शत्रुशी बेभान होऊन लढताना तानाजीच्या हातातील ढाल तुटल्यावर डाव्या हातावर उदयभानाचा घाव घेत तानाजींनी प्राण सोडला. मात्र त्यांच्या मागून सुर्याजी मालुसरे व शेलारमामा यांनी नेतृत्व करुन किल्ला काबीज केला. गवताच्या गंजी पेटवून किल्ला जिंकल्याचा निरोप राजगडावर पोचवला. ही घटना ४ फेब्रुवारी १६७० रोजी घडली. दुस-या दिवशी शिवाजीराजे गडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी कळली. किल्ला जिंकला पण सिंहासारखा तानाजी गेला. याचे दुःख त्यांना झाले. गड आला पण सिंह गेला. ही म्हण तेथून पुढे रुढ झाली. उमरठ्यात तानाजींचे अंत्यसंस्कार झाले तेथे वीरगळ स्थापन केली आहे. सुंदर स्मारक आजही तानाजींच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहे. सिंहगड हा पुण्यापासून जवळच आहे. गडावर तानाजी मालुसरे यांचा अर्धाकृती पुतळा आहे. तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाने पवित्र झालेल्या या गडाने मावळ्यांच्या पराक्रमाचा वैभवशाली वारसा जतन केला आहे. तानाजी मालुसरे यांचा पराक्रम पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. छत्रपती शिवाजी महाराजांना जीवाची बाजी लावणारे मावळे मिळाल्याने रयतेचे राज्य उभे करणे शक्य झाले.
लेखक
दशरथ यादव, पुणे (सासवड)