खेलो इंडियाअंतर्गत सायकलिंगमध्ये स्वरा भागवतने पटकावले ‘गोल्ड मेडल’


दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील गोखळी (ता. फलटण) येथील तिरंगा पब्लिक स्कूल येथे शिकणार्‍या कु. स्वरा योगेश भागवत (वय ११) हिने बारामती येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सायकलिंगमध्ये १५ वर्षांंतर्गत स्पर्धेत ‘गोल्ड मेडल’ पटकवाले.

स्वराने सहाव्या वर्षी एका मिनिटात १०० पुशअप्स, ५० प्रकारचे रोप जम्प, प्राणायाम, योगासने केली आहेत. ती स्वीमिंग अडीच वर्षांची असताना शिकली आहे. सहाव्या वर्षी १४३ किलो मीटरचे अंतर गोखळी, बारामती, मोरगाव, जेजुरी, निरा, लोणंद, फलटण, राजाळे, गोखळी असा सायकल चालविण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.

महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर १ तास ५६ मिनिटांत लहान वयात सर करणारी स्वरा भागवत एकमेव मुलगी आहे. या विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.

या कामगिरीबद्दल स्वराचा सत्कार जय पवार तसेच महाराष्ट्र सायकलिंग फेडरेशनचे चिफ प्रताप जाधव यांनी केला. स्वराचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!