
दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेम्बर २०२२ । फलटण । साखर कारखानदारांनी विना कपात एक रकमी एफ आर पी द्यावी. हंगाम संपल्यावर ३५० रुपये द्यावे. अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. मात्र याकडे कोणीच हवे तसे लक्ष देत नाही. म्हणूनच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १७ व १८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन करीत आहोत. त्यातूनही दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
या २ दिवसात शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नयेत. रस्त्यावरून ऊस वाहतूक करु नये. आंदोलनाला सहकार्य करावे. आमच्या या आंदोलनाला अनेक ऊसतोड वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमच्यात नेहमी सारखा संघर्ष होणार नाही. असा विश्वासही स्वाभिमानीचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. केंद्र सरकार विरोधात बोलण्याची साखर कारखानदारांची हिंमत नाही. मग आम्ही संघर्ष करतोय तर त्याला कारखानदारांनी खोडा न घालता पाठिंबा द्यावा असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. यावर्षी एफ आर पी कशावर ठरवली ? खतांच्या, औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. त्याचा विचार केला का ? आदी मुद्दे घेऊन आम्ही कृषीमूल्य आयोगाकडे मांडणार आहोत, असेही स्वाभिमानीच्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
सदरील निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामूलकर, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, युवक राज्यप्रवक्ते प्रमोद गाडे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, दादा जाधव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, तालुका उपाध्यक्ष शकील मणेर, निखिल नाळे, किसनराव शिंदे, सोमंथळी शाखाद्यक्ष बाळासाहेब शिपकूले, शिवाजी सोडमिसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.