दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । वाई । सोनगिरवाडी, ता. वाई येथील मत्रिाच्या बरोबर कुत्रा पहायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह धोम धरण रस्त्यावर सापडल्याने खळबळ उडाली आहे. अभय शशिकांत जावलीकर असे मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, अभय शशिकांत जवलीकर हा मुलगा मंगळवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान मित्राच्या बरोबर कुत्रा पाहायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. जाताना त्याने आपली दुचाकी व जवळच्या ओळखीच्या माणसाकडून पन्नास रुपये घेतले होते. बुधवारी रात्री त्याचा मृतदेह एकसर, ता. वाई हद्दीत धोम धरण रस्त्यावर आढळून आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात मयत म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे पोलीस ठाण्यापासून सांगण्यात आले. मात्र, जावलीकर कुटुंबीयांनी अभयच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळी रात्री डॉग्सस्कॉड आणि फॉरेन्सिकचे अधिकारी आले होते. त्याची दुचाकीही त्याच परिसरात आढळून आली. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे पोलीस करत आहेत.