सुषमा अंधारेंची नितेश राणेंवर बोचरी टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर घणाघाती टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून नितेश राणे यांनी सुषमा अंधारेंचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता पुन्हा सुषमा अंधारे यांनी नितेश राणेंवर घणाघाती टीका केली आहे.

काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली होती. तो व्हिडीओ नितेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केला. त्यावर ‘हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन? अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी?’ असा सवालही नितेश राणे यांनी केला होता.

राणेंच्या टीकेवर अंधारे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील भाषण करतानाच जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात फडणवीस नारायण राणे यांच्या भ्रष्टाराचा पाढा वाचताना दिसत आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी लिहिले की, ‘प्रिय नीतू बाळा, तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्कची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरापट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास. पण पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर तू आता अशा अर्ध्या कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास.’

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल 2015 सालचं तुझं ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस? किंवा गानसम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही. मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणाऱ्या प्राणप्रिय नेत्याचा पाठवत आहे. भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या बाबांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेलच. तुझी आत्या,’ असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!