स्थैर्य, दि.२: छोट्या पडद्यावर गाजलेली पवित्र रिश्ता ही मालिकात आता पुन्हा परतत आहे. आता ही मालिका नवीन स्वरुपात ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुशाल जावेरी यांनी सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे स्टारर या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. दिव्य मराठीसोबत बोलताना त्यांनी ही मालिका परत येत असल्याचा खुलासा केला. कुशाल सध्या त्यांच्या आगामी ‘क्रॅश’ या वेब सीरिजवर काम करत आहे. कुशल म्हणाले की, वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याची कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत माहित असते.
अंकिता लोखंडेने साईन केला शो
कुशाल यांनी बरीच वर्षे ‘पवित्र रिश्ता’चे दिग्दर्शन केले होते. एकता कपूर पुन्हा हा कार्यक्रम पडद्यावर आणण्याच्या विचारात असून या माध्यमातून अंकिता लोखंडे कमबॅक करेल. याबद्दल कुशल म्हणतात, “हो, ही मालिका पुन्हा परतत असल्याचे मला माहित आहे. अंकिताने मला फोन करून ही मालिका साइन केल्याचे सांगितले आहे. मला हे ऐकून खूप आनंद झाला, कारण हा कार्यक्रम माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे.”
सुशांत मी खूप मिस करेल – कुशल
ते पुढे म्हणाले, “माझ्याव्यतिरिक्त काही इतर दिग्दर्शकही त्या कार्यक्रमाशी संबंधित होते. जर पुन्हा संधी मिळाली तर मला पुन्हा त्या प्रोजेक्टचा एक भाग व्हायला आवडेल. मला दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली नाही तरी मालिका बघायला आवडेल. अंकिता एक खूप चांगली अभिनेत्री आहे, ती जे काही करते, त्यासाठी ती 100% मेहनत घेते. शोच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल.” सुशांत सिंह राजपूतबद्दल विचारले असता कुशालने सांगितले की, त्याची खूप आठवण येईल. पवित्र रिश्ता 2.0 अल्ट बालाजी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.
क्रॅशची कहाणी मुंबई शहराच्या अवतीभोवती फिरेल
आपल्या आगामी क्रॅश या वेब सीरिजबद्दल बोलताना कुशाल म्हणाले, “वेब सीरिजविषयी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत माहित असते. अभिनेत्यांबरोबर कार्यशाळा करायला आणि अधिक विचार करायला वेळ मिळतो, काम करण्यासाठी एक चांगले बजेटदेखील असते, जे एका टीव्ही शोपेक्षा अधिक फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. या मालिकेची कहाणी मुंबई शहराभोवती फिरते. मी स्वतः मुंबईचा आहे आणि म्हणूनच मी या कथेशी रिलेट करतो. सुमारे तीन वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून परतत असल्याने खूप उत्साही आहे. पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी एकताचे मनापासून आभार मानू इच्छितो. “