स्थैर्य, सोलापूर, दि.३१: कोविड संसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये सोलापूर जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची दुसरी बैठक जिल्हाधिकारी निवासस्थानी असलेल्या कार्यालयात झाली. त्या बैठकीत श्री. शंभरकर यांनी सूचना दिल्या. बैठकीला पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, महिला व बालविकास अधिकारी विजय खोमणे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, पोलीस निरीक्षक पी. एफ. साळुंखे उपस्थित होते.
जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेली मुले आहेत का, असल्यास कोणत्या तालुक्यात आहेत याबाबत आठ दिवसांत सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या. सध्या सोलापूर जिल्ह्यात कोविडमुळे जिल्ह्यातील बालगृहातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागास पत्र लिहावे, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.
सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात कोविडमुळे अनाथ झालेली 16 बालके असून काही सामाजिक संस्था बालकांचे पुनर्वसन करण्याबाबत आवाहन करीत आहेत. पण शासनाच्या परवानगीशिवाय कोणालाही असे काम करता येणार नाही, असे श्री. खोमणे यांनी स्पष्ट केले. यावर असे परस्पर कोणी करीत असल्यास त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवावे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
बालकांच्या समस्यांबाबत संपर्क क्रमांक
चाईल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नियंत्रण कक्ष ०२१७- २७३२०००, २७३२०१०, अनुजा कुलकर्णी, अध्यक्ष बालकल्याण समिती ९४२३३३०४०१, विजय खोमणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ८६०५४५३७९३, आनंद ढेपे ९८८१४९०२२६, दीपक धायगुडे ७३८७२६७९२२, जयाप्रदा शरणार्थी ७९७२५५०४२३, शोभा शेंडगे ९६८९९५८६४५.