
स्थैर्य, फलटण, दि. 7 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मधून सामाजिक कार्यकर्ते सुरेश निंबाळकर यांनी राजे गटाकडे उमेदवारीची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत आपल्या समर्थकांसह मुलाखतीसाठी हजेरी लावली.
येथील गोविंद डेअरी येथे राजे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीदरम्यान सुरेश निंबाळकर यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे प्रभाग क्रमांक ४ मधून उमेदवारी देण्याची मागणी केली.
सुरेश निंबाळकर यांनी मुलाखतीवेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्यासमवेत शेकडो ज्येष्ठ नागरिक आणि युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरेश निंबाळकर हे शहरातील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांनी नवदुर्गा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
त्यांची मुले अभिजित निंबाळकर आणि संग्राम निंबाळकर हे देखील वडिलांप्रमाणेच सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असतात.
अडचणीच्या वेळी लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे निंबाळकर कुटुंबाचा परिसरात मोठा जनसंपर्क आहे. या जोरावरच त्यांनी उमेदवारीची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे.

