दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२३ । मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी नव्या जबाबदारीची सुरुवात गांधीगिरीने केली. नव्या जबाबदारीची घोषणा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुळे यांनी थेट गांधी दर्शन शिबिराला लावून त्यांच्या कार्याच्या पुढील दिशेबाबत सुतोवाच केले आहे, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे. कार्याध्यक्ष पदाच्या नियुक्तीबाबत सुळे यांना झुकते माप देऊन अजित पवारांवर अन्याय केल्याच्या चर्चेची राळ थंड होत नाही तोवर सुळे यांनी केलेल्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा छेडली आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने कोथरूड येथे आयोजित गांधी दर्शन शिबिराच्या निमित्ताने सुळे यांनी गांधी भवनला रविवारी (ता. ११) भेट दिली. त्यांनी येथील गांधीजींच्या पुतळ्याला वंदन केले. युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांचे आशीर्वादही घेतले. डॉ. सप्तर्षी यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सुळे यांचा सत्कार केला. गांधी दर्शन शिबिरात शिबिरार्थी म्हणून त्यांनी पाच तास वेळ दिला. या दरम्यान विविध वक्त्यांचे विचार ऐकले.
दरम्यान, संध्याकाळी सुळे यांनी, ‘अजित पवार हे राज्यातील मोठे नेते असून विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत.’ असे सांगत त्यांच्यावर अन्याय झाल्याच्या चर्चा आधारहीन असल्याचे सांगितले. अजित पवार आणि समर्थकांना शांत करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.