स्थैर्य,नाशिक, दि.१: वनक्षेत्रात मानवाच्या हस्तक्षेपामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. त्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी बिबट्याच्या हल्ल्याचा धोका अधिक आहे. अनेकदा रात्री शेताला पाणी देत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र यावेळी बिबट्याच ऊसतोड कामगाराच्या हाती लागला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कुरुडगाव शिवारात ऊस तोडणी चालू असताना बिबट्याचे बछडे आढळले. मात्र ऊस तोडणी कामगारांच्या पोरांनी या बछड्याला उचलून घेत बछड्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आपले मोबाईल बाहेर काढून फोटोसेशन केले. यावेळी परिसरात बिबट्याची मादी देखील होती. फोटोसेशन झाल्यानंतर या बिबट्याच्या बछड्यांना पुन्हा ऊस तोडणी कामगारांनी मादीकडे सोडून दिले. ही हिंमत ऊसतोड कामगाराच्या जीवावर देखील बेतली असती. सुदैवाने तसं काही घडले नाही.
ऊसतोड कामगाराने बिबट्याच्या बछड्याला उचलून घेतल्यानंतर इतर कामगारांनी देखील गर्दी केली होती. ही गर्दी त्यांच्या जीवावर देखील बेतण्याची शक्यता होती. मात्र या कामगारांनी वेळीच बछड्याला त्याच्या आईकडे सोपल्याचे समजते.