नुकसानीमुळे ऊस उत्पादक मेटाकुटीला आले


स्थैर्य, सातारा, दि. ०४ : मध्यंतरी झालेल्या चक्राकार वादळीवार्‍यासह पावसाने ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. उसाचे पीक विंगसह विभागात ठिकठिकाणी कोसळले आहे. काही ठिकाणी भुईसपाटही झाले आहे. नुकसानीमुळे ऊस उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर विभागात पावसाने पुन्हा प्रारंभ केला आहे. ऑगस्टच्या प्रारंभी चक्राकार वादळी वार्‍यासह जोराचा पाऊस झाला. एकीकडे खरिपातील सोयाबीन, भुईमुगासारख्या पिकांना त्याने जीवदान मिळाले. शेतकरी समाधानी झाले. मात्र, ऊस पिकाला त्याचा मोठा फटका बसला. चक्राकार वार्‍यामुळे उसाचे पीक ठिकठिकाणी कोसळले. भुईसपाटही झाले आहे. उत्पादकांचे त्यात मोठे नुकसान झाले आहे. कराड तालुक्यात सुमारे 15 हजार हेक्टरवर उसाचे पीक आहे. आडसाली, सुरू, खोडवा, पूर्व हंगामीचा समावेश त्यात आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाने ते अचानक कोलमडले आहे. ठिकठिकाणी ते भुईसपाट झाले आहे. तालुक्यात हे चित्र आता सहज दृष्टीस पडत आहे. आर्थिक नफ्याच्या दृष्टीने या पिकाकडे पाहिले जाते. शेतकर्‍याचे वर्षभराचे अर्थचक्र त्यावर चालते. कबाडकष्ट करून मोठ्या उमेदीने चांगल्या पद्धतीने ते त्यांनी जोपासले आहे. आडसाली व पूर्व हंगामातील पीक 18 ते 25 कांड्यावर आहे. वाढही अपेक्षित आहे. लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून कुटुंबीयदेखील पिकावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, मध्यंतरी झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाचे संकट त्यावर कोसळले आहे. पीक नुकसानीची भीती त्यामुळे आहे. चक्राकार वार्‍याने ही स्थिती केली आहे. ऊस उत्पादकांचे समाधान त्याने हिरावून घेतल्याचे चित्र आहे. त्यातच हुमणी व लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव उसावर ठिकठिकाणी आहे. हुमणी किडीने मुळांना लक्ष्य केले आहे तर माव्याने पानावर हल्ला केला आहे. त्या ठिकाणचे पीक सहज कोसळत आहे. नुकसानीत एकप्रकारे भरच पडत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!