दैनिक स्थैर्य । 03 जुलै 2025 । फलटण । लावणी लोकधारेच्या रंगभूमीवर आवाजाचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे सुधीर नेमाणे, साखरवाडी, ता. फलटण यांना बालगंधर्व परिवार पुरस्कार २०२५ ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रंगभूमीवर आपल्या दमदार निवेदन कौशल्याने अविरत २४ वर्षे योगदान देणारे सुधीर लक्ष्मण नेमाणे यांना बालगंधर्व रंगमंदिराच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बालगंधर्व परिवार पुरस्कार २०२५ दि. २५ जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.
निवेदनकलेचा प्रेरणादायी प्रवास
शो मस्ट गो ऑन या तत्त्वाला आत्मसात करत सन २००१ पासून व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असलेल्या सुधीरजी नेमाने यांनी आजवर ७०० हून अधिक चौफुला प्रयोग आणि कोका कोला कंपनीच्या थम्सअप चौफुलाच्या प्रमोशनल शोमध्ये तब्बल ३०० प्रयोग यशस्वी केले आहेत.
या प्रवासात त्यांना दिवंगत विनोदी कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली. सुप्रसिद्ध निवेदक पराग चौधरी, सुशील थिगळे, गायक, संगीतकार, निवेदक चित्रसेन भंवर, विलास मडके, प्रमोद शेंडगे, सोमनाथ फाटके आणि अरुण गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
मंचावरून स्टुडिओपर्यंतचा प्रवास
निवेदनासोबतच मिमिक्री आणि गायनातही त्यांनी आपल्या कलागुणांची चुणूक दाखवली आहे. चौफुला, नटरंगी नार, कारभारी दमान, रंगात रंगला महाराष्ट्र, गर्जा महाराष्ट्र, मदमस्त अप्सरा, तुमच्यासाठी काय पण यांसारख्या अनेक लोकप्रिय लोकधाराच्या कार्यक्रमांमध्ये निवेदक म्हणून त्यांनी योगदान दिले आहे.
सन २०११ साली त्यांनी कार्तिक रेकॉर्डिंग स्टुडिओची स्थापना केली. त्याचेच आजचे आधुनिक रुप म्हणजे के टाईम्स मिडिया– एक नावाजलेली अॅडव्हर्टायझिंग एजन्सी या अंतर्गत ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया व्हिडिओज, एफ. एम. जिंगल्स, निवडणूक गीते, डिजिटल मार्केटिंग यांसह व्यावसायिक शो सादर केले जातात.
शिस्त, निष्ठा आणि कृतज्ञता
निर्मात्याने तारीख दिली आणि मी गेलो नाही, असं एकदाही झालं नाही, अशा शब्दांत त्यांची कार्यशिस्त स्पष्ट होते. सुधीर नेमाने यांच्या यशामागे सर्वात मोठं योगदान मेघराज भैय्यांचं असल्याचे ते नम्रतेने नमूद करतात. जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत शो चालूच राहील, असं म्हणणारे सुधीर नेमाणे हे साखरवाडी गावाचे खरं भूषण आहेत.

