राष्ट्रीय हॉकी खेळाडू प्रदीप ननवरे यांचे आकस्मिक निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटणचे सुपुत्र सिनियर राष्ट्रीय हॉकी खेळाडू प्रदीप प्रकाशराव ननवरे (वय ४१) हे सध्या कार्यरत असलेले क्राइम ब्रांच पोलीस, भोईवाडा पोलीस ठाणे, मुंबई येथून ऑफिस कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे कर्तव्य बजावत असताना दि. २८ (शनिवारी) सायंकाळी ७.०० वा. त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

ननवरे यांचे पार्थिव संभाजीनगर येथून जाधववाडी (ता. फलटण) येथील निवासस्थानी पोहचेपर्यंत विविध ठिकाणी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जाधववाडी (ता. फलटण) येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असताना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत त्यांना मानवंदना देण्यात आली.

ननवरे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारवेळी भोईवाडा पोलीस ठाणे, फलटण ग्रामीण व शहर पोलिस ठाणे, सातारा जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी, राजकीय व सामाजिक पदाधिकारी, मित्रपरिवार आदी उपस्थित होते.

प्रदीप यांनी शालेय जीवनात फलटण एज्युकेशन सोसायटी व राज्य पोलिस हॉकी संघाच्या माध्यमातून हॉकी स्पर्धेत अत्यंत उत्तम कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले. यामुळे अनेक पदके, पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ते पत्रकार बाळासाहेब ननवरे यांचे पुतणे आहेत.


Back to top button
Don`t copy text!