
दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुन २०२२ । फलटण । तालुक्यातील काळज येथील चार वर्षाची कु. समृद्धी भंडलकर ही फलटणवरून काळज येथे जात असताना नाना पाटील चौकाच्या नजीक कु. समृद्धीला मांजाने कापले मांजाने कापल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होवू लागला त्यानंतर डॉ. अंजली फडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली व त्यामध्ये चार वर्षाच्या कु. समृद्धी भंडलकरचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलेले आहे.
नाना पाटील चौक येथे कु. समृद्धी भंडलकरला जेंव्हा मांजाने कापले त्यावेळी तातडीने तिला डॉ. अंजली फडे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिला फडे यांच्या दवाखान्यात आणले त्यावेळी कु. समृद्धीचे नाडीचे ठोके लागत नव्हते. कु. समृद्धीचा संपुर्ण चेहरा पांढरा पडला होता. तिच्या शरिरातील रक्त कमी झालेले होते. यावेळी डॉ. अंजली फडे यांनी फलटण येथील तज्ञ डॉ. भारत पोंदकुले (सर्जन), डॉ. नेत्रा गांधी, डॉ. प्राश्वनाथ राजवैद्य यांच्याशी तातडीने संपर्क साधुन लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल केले. व अवघ्या ४० मिनिटांत लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये सर्व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली.
शस्त्रक्रियेसाठी दाखल केले असता कु. समृद्धीची मानेच्या जवळील मुख्य रक्तवाहिनी ही मांजामुळे कापली गेली होती. शरिरातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला होता. सुमारे स्वव्वादोन चाललेली शस्त्रक्रिया ही यशस्वी झाली व चार वर्षाच्या कु. समृद्धीला जीवदान देण्यात डॉ. अंजली फडे, डॉ. भारत पोंदकुले, डॉ. नेत्रा गांधी व डॉ. प्राश्वनाथ राजवैद्य यांना यश आले.
फलटणचे लाईफलाईन हॉस्पिटल म्हणजेच फलटण आरोग्य मंडळ संचलित श्रीमंत मालोजीराजे रौप्यमहोत्सवी रूग्णालयात नेहमीच विविध शस्त्रक्रिया ह्या यशस्वी रित्या होत असतात. कु. समृद्धीवर वेळेत झालेल्या उपचार व शस्त्रक्रियेमुळेच तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण आरोग्य मंडळ संचलित श्रीमंत मालोजीराजे रौप्यमहोत्सवी रूग्णालय म्हणजेच लाईफलाईन हॉस्पिटल येथे विविध शस्त्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध आहेत.
फलटण मेडीकल फौंडेशन संचलित फलटण ब्लड बॅंकेमुळे तातडीने रक्त मिळाले त्यामुळे फलटण येथील ब्लड बॅंकेत फलटणमधील नागरिकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाचाही प्राण वाचू शकतो.
फलटण शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी राजरोजपणे अवैधरित्या मांजा विक्री सुरू असते त्यावर पोलींसानी कडक कारवाई करून तालुक्यातुन मांजा हद्दपार करावा, अशी चर्चा यानिमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.