
दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून मत्स्यपालन करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग करण्याचे श्रेय हे कोरेगाव तालुक्यातील देविका समूहाला मिळते. चाकोरीबाहेरच्या व्यवसायामध्येही जर आपण पूर्ण आत्मविश्वासाने उतरलो तर नक्कीच आपल्या कार्यकर्तुत्वातून आपण यश मिळवू शकतो हा आदर्श या समूहाने इतर महिलांना व महिला स्वयंसहाय्यता समूहांना घालून दिलेला आहे. देविका समूहाच्या या प्रवासात उमेद अभियानाने एक दीपस्तंभाची भूमिका पार पाडली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये असलेले त्रिपुटी हे साधारणपणे 300 उंबरठ्यांचे गाव. गावातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहे. महिलांच्या हाताला देखील शेतमजुरीचे काम मिळत असते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियान (उमेदच्या) माध्यमातून गावामध्ये महिला स्वयंसहाय्यता समूहाची स्थापना करण्यात आली. उमेद दशसुत्रीच्या माध्यमातून महिलांना अभियानाचे महत्व कळत गेले. महिलांना समूह, बचत, भांडवल, ग्रामसभा, आरोग्य, शिक्षण, रोजगार इ. गोष्टी आणि त्यामध्ये महिलांचा असणारा सहभाग या संकल्पना जवळच्या वाटू लागल्या.
देविका महिला स्वयंसहाय्यता समूह हा गावातीलच एक समूह, याची स्थापना 2015 मध्ये झालेली आहे. समूहातील प्रत्येक महिला ही महत्वकांक्षी आणि मेहनती आहे. आपला समूह हा ठोकळेबाज बचत गट न राहता रोजगाराची दिशा देणारा स्वयंसहाय्यता समूह असावा अशी यातील सर्वांची इच्छा होती. त्यामुळे समूहाला 3 वर्ष पूर्ण झाल्यावर जमलेली रक्कम आपापसांत वाटून न घेता कोणतातरी व्यवसाय करण्यासाठी भांडवल म्हणून वापरुया हा मतप्रवाह एकमताने पुढे आला. नेमका कोणता व्यवसाय आपण समूह म्हणून करु शकतो यावर प्रत्येक मिटींगमध्ये चर्चेच्या फैरी झडू लागल्या. गावातील भौगोलिक परिस्थिती, इतर पार्श्वभूमी आणि भविष्यातील संधी या सर्वांचा सारासार विचार करुन देविका समूहाने मत्स्यपालन हा व्यवसाय करण्याचे निश्चित केले. तसे पाहायला गेले तर गावामध्ये 100 वर्षापूर्वीचा दगडी बांधकामात तयार केलेला मोठा तलाव आहे. या तळ्यामध्ये पूर्वी मासेपालन केले जात होते मात्र मागील तीन वर्षांपासून हा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन समूहाने मासेपालन करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
उमेद मार्फत मिळालेले खेळते भांडवल, समूहाची तीन वर्षापासूनची रक्कम आणि प्रत्येक महिलेने जादा जमा केलेली प्रत्येकी 2 हजार रुपये, असे मिळून सुरुवातीला 80 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरु करण्यात आला. समूहाच्या सचिव सौ. संतोषी काटकर यांनी स्वमालकीच्या 5 गुंठे जागेत छोट, मध्यम व मोठे अशा तीन आकाराची शेततळी खोदली आणि त्या ठिकाणी समूहामार्फत मासेपालन सुरु करण्यात आले. मासेपालन किंवा मस्त्यविक्री याचा कोणताही पूर्वानुभव नसताना You Tube आणि बाजारात उपलब्ध असणारी नियतकालिका, माहितीपुस्तिका यातून या समूहाने मासे पालनाविषयी प्राथमिक माहिती मिळाली. तसेच सौ. संतोषी काटकर यांच्या मुलाने वेळोवेळी समूहाला मार्गदर्शन आणि वेळ देखील दिला.
शेततळे खोदल्यानंतर त्यासाठी लागणारे इतर मुलभूत साहित्य जसे की प्लास्टिक कागद, पाण्याची मोटार, दोरी इत्यादी साहित्य स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्यात आलेले आहे. तर सुरुवातीला शिपर्णीस जातीच्या माश्यांचे 5 हजार मत्स्यबीज आणि खाद्य हे पश्चिम बंगालहून कुरिअरच्या माध्यमातून मागवण्यात आलेले होते. परंतु व्यवसायातील नवेपणा आणि तज्ञ मार्गदर्शनाचा अभाव यामुळे 5 हजार पैकी फक्त 3 हजार मत्स्यबीज जगू शकले. पहिल्याच प्रयत्नात आलेल्या अपयशाने खचून न जाता समूहातील महिलांनी त्यांचे नेमके कुठे चुकले याचा शोध घेतला. तालुका अभियान कक्षाच्या मदतीने मासेपालन क्षेत्रातील तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन घेतले, समूहातील प्रत्येक महिलेची व्यवसायातील जबाबदारी निश्चित केली. तज्ञ मार्गदर्शन आणि आपापसातील योग्य नियोजन आणि आंतरिक प्रेरणा या त्रिसुत्रीच्या जोरावर समूहाचा आत्मविश्वास दुणावला आणि पुन्हा नव्या उमेदीने समूह कामाला लागला. पुढच्या वेळेस त्यांनी 10 हजार मत्स्यबीजे मागवून त्यांचे यशस्वी संगोपन करुन 10 हजार पैकी 9 हजार 400 मासे जोपासून त्यांची विक्री ही केली. स्थानिक बाजारपेठेत ताज्या माशाला मोठी मागणी असल्या कारणाने 200 ते 250 रुपये प्रति किलो दराने जाग्यावर मासा विकला गेला.
मासे लहान असताना छोट्या तळ्यात ठेवतात, त्यांची थोडी वाढ झाल्यावर त्यांना मध्यम आकाराच्या तळ्यात सोडले जाते आणि पूर्ण वाढ झालेल्या माशांना मोठ्या आकाराच्या तळ्यात हलवले जाते. सध्या बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत समूहाला 2 लाख रुपये कर्ज मिळालेले आहे. त्यातून समूहाने शिपर्णीस या जाती सोबतच कटला, रुपचंद या जातीचे मत्स्यबीज तळ्यामध्ये सोडलेले आहेत.
मासे विकण्यायोग्य होण्यासाठी 8 ते 10 महिन्यांचा कालावधी जातो. आता सोडलेल्या माशांच्या होणाऱ्या विक्रीतून समूहाने घेतलेले सर्व कर्ज गुंतवणूक फिटून समूहाला मोठा फायदा होणे नियोजित आहे. माशांना योग्य त्या आकारमानाच्या तळ्यात सोडणे, माशांना वेळच्यावेळी खाद्य देणे, तळ्यात उतरुन माशांची वाढ योग्य आहे की नाही ते वजन करुन तपासणे, तळ्यातील पाणी वेळच्यावेळी बदलणे, ग्राहाकांना मासे पकडून देणे तसेच अगदी विक्रीसाठी माशांची कटींग करणे इत्यादी सर्व कामे ही समूहातील महिलाच करतात.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तयार केलेली तळी ही कृत्रिम तळी आहेत त्यामुळे त्या तळ्यांमधील पाणी हे वेळच्या वेळी बदलणे क्रमप्राप्त ठरते अन्यथा दुषित पाण्यामध्ये ऑक्सिजनच्या कमरतेमुळे मासे मरतात. ज्यावेळी तळ्यातील पाणी बदलले जाते तेव्हा ते पाणी वाया न घालवता समूहाद्वारे लावलेल्या भाजीपाल्याच्या मळ्यामध्ये सोडले जाते. त्यातून त्या पिकांना उपयोगी असले मत्स्यखत मिळते. म्हणजे या समूहातील महिलांनी पक्का व्यावसायिक दृष्टीकोन अवलंबला आहे हे लक्षात येते.
संकलन,
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा