श्रीरामाला पूर्ववैभवाप्रत नेण्याचे प्रयत्नात यशस्वी : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : श्रीराम आर्थिक गर्तेत रुतल्यानंतर अवसायानात काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते, तथापी श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेबांनी स्थापन केलेला हा कारखाना अवसायानात न काढता सुरु ठेवला, त्यानंतर जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व हितचिंतकांच्या सहकार्याने श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाच्या माध्यमातून स्व. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व स्व. श्रीमंत शिवाजीराजे यांनी घालुन दिलेल्या आदर्शांनुसार ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांचे हिताला प्राधान्य देऊन चालविताना  श्रीरामाला पूर्ववैभवाप्रत नेण्याचे प्रयत्नात यशस्वी झाल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व घटकांना धन्यवाद देत यावर्षीच्या हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.

श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाच्या सन २०२० – २०२१ मधील १५ व्या गळीत हंगामातील रोलर पूजन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, आ. दीपकराव चव्हाण, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाले, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कारखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वरीलप्रमाणे आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीरामच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे हिताला प्राधान्य, विशेषतः ऊसाला रास्त दर, वेळेवर तोड, योग्य वजन, नियमानुसार वेळेवर ऊसाचे पेमेंट, त्याचप्रमाणे कामगारांना पगार व त्यांची सर्व देणी वेळेवर मिळतील याला प्राधान्य दिले तीच भूमिका कायम ठेवून सर्वांचे हित जपण्याबरोबर श्रीरामला पूर्ववैभवाप्रत नेताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला परंतू खा. शरदराव पवार यांचे मार्गदर्शन आणि माजी खासदार कल्लाप्पाआण्णा आवाडे, आ. प्रकाश आवाडे यांच्यासह सर्वांचे सहकार्याने ते शक्य झाल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात गतवर्षीच्या हंगामात ३ लाख ३९ हजार ६३२ मे. टन ऊसाचे गाळप करुन ३ लाख ८० हजार ३८५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याचे, तसेच प्रतिटन २५६३ रुपये प्रमाणे गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाचे पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वेळेत जमा केले, तोडणी वाहतूक ठेकेदार, कामगार यांचीही सर्व देणी, पगार वेळेत दिल्याचे निदर्शनास आणून देत गतवर्षीच्या हंगाम यशस्वीतेसाठी सहकार्य केलेले ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व अन्य घटकांचे आभार मानले. 

या वर्षीच्या हंगामात प्रतिदिन ३२००/३३०० मे. टन गाळप करुन ५ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करीत त्यासाठी १९८ ट्रक व इतर वाहने, २३१ अंगद ट्रॅक्टर, २११ बैलगाडी धारकांशी तोडणी वाहतूक करार करुन त्यांना आगाऊ रक्कम दिली आहे, उर्वरित करार सुरु असल्याचे नमूद करतानाच आतापर्यंत कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचे ५९६८ हेक्टर व बिगर सभासद शेतकऱ्यांचे २५२२ हेक्टर क्षेत्रातील ऊस नोंदणी झाली असल्याने ऊसाची उपलब्धता लक्षात घेता उद्दिष्ट पूर्तीसाठी तोडणी वाहतुकीचे नियोजन करुन हंगाम यशस्वी करण्याची ग्वाही डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिली.

कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन भोसले यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. श्रीराम जवाहरचे व्यवस्थापक मानसिंग पाटील यांनी सूत्र संचालन केले.

कार्यक्रमास श्रीरामचे संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या शासन/प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत सोशल डिस्टनसिंग, मास्क व सॅनिटायझर वापर आणि गर्दी टाळून कार्यक्रम पार पाडल्याचे मानसिंग पाटील यांनी सूत्र संचालनादरम्यान आवर्जून सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!