दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२३ । मुंबई । ‘बारावीच्या परीक्षेनंतर करिअरची दिशा निश्चित होते. त्यामुळे या परीक्षेसाठी मेहनत घेतली जाते. बारावी परीक्षेतील यशासाठी उत्तीर्ण सर्व गुणवंत- यशवंताचे अभिनंदन, त्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारावी उत्तीर्णांचे अभिनंदन केले आहे. या परीक्षेत यंदा मुलींनी, दिव्यांगांनी लक्षणीय यश मिळवले आहे, त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘आयुष्यात येणारे महत्त्वाचे टप्पे-आव्हाने म्हणजे एक परीक्षाच असते. या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी अशा परीक्षा करवून घेत असतात. त्यामुळे सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. कित्येकजण कठोर मेहनत घेतात, त्यातून मिळालेले यश नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ देते. बारावीच्या परीक्षेत असे यश मिळविणाऱ्यांचे आणि त्यासाठी त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा’.
‘परीक्षा एक टप्पा आहे. त्यामुळे यात यश न मिळालेल्यांनी खचून न जाता, नव्या उमेदीने प्रयत्न करावेत. यश तुमचेच असेल’, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.