तरडफ, गिरवी परिसरात येथे वादळी वार्‍यांसह प्रचंड पाऊस; उपळवे येथे वीज पडून ६ शेळ्या तर तरडफ येथे गाय दगावली


दैनिक स्थैर्य | दि. २६ मे २०२३ | फलटण |
गुरुवारी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून फलटण शहरात अचानक वादळी वारे सुरू झाले. या वार्‍याने काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्यादरम्यान गिरवी भागात जोराचा पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर तरडफ येथे प्रचंड वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊन अक्षरशः ढगफुटीसारखा प्रचंड पाऊस बरसला. गाराही पडल्या आणि ओढ्या-नाल्यांना पूर आला होता.

गुरुवारी सायंकाळी गिरवी येथे प्रारंभी हलका पाऊस झाला, नंतर पावसाने गिरवी व परिसराला अक्षरशः झोडपून काढले. दरम्यान, उपळवे (सावंतवाडी) येथे विजेच्या धक्क्याने बजरंग साहेबराव फडतरे यांच्या ६ शेळ्या दगावल्या आहेत. तरडफ येथे अशोक सदाशिव गोडसे यांची एक गाय दगावली आहे. तलाठी मंडलाधिकारी यांनी दोन्ही ठिकाणचे पंचनामे केले आहेत. तथापि गाय व शेळ्या दगावल्याने त्यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

या वादळी पावसाने तरडफ येथे जीवन पांडुरंग रीटे यांच्या वीटभट्टीचे सुमारे ४ ते ४.३० लाख रुपयांचे झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!