वाझर सारख्या छोट्या खेड्यातील शुभम सुधीर जाधव या मुलाची राज्यसेवा परिक्षेत बाजी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । सांगली । खानापूर तालुक्यातील येरळा नदीकाठावर वसलेले छोटेसे खेडेगाव म्हणजे वाझर. याच वाझर मधील अनेक मुला-मुलींनी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव उज्वल केलेले आहे. सुधीर बाबुराव जाधव वाझर मधील एक सर्वसामान्य शेतकरी. गावच्या राजकीय सामाजिक चळवळीत प्रगल्भ असणारे व्यक्तिमत्व तर त्यांचे वडील स्व.बाबुराव जगदेव जाधव हे वाझर चे पहिले सरपंच म्हणून कामगिरी करणारे आदर्श सरपंच होते. सुधीर जाधव यांची पत्नी हीसुद्धा तासगावचे राजकीय क्षेत्रातील अत्यंत मोठे नाव असणारे नेते, माजी नगराध्यक्ष स्व. डी एम पाटील यांची कन्या आहे. अशा सामाजिक राजकीय शैक्षणिक दृष्ट्या चांगला वारसा लाभलेल्या कुटुंबातील शुभम ने नुकतीच राज्यसेवा परिक्षेत बाजी मारली असून राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. शुभम ची वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. शुभम च्या यशामुळे वाझर सारख्या छोट्या गावातील सर्वांना खूप मोठा आनंद झाला असून शुभमवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून गावाने त्याची मोठी मिरवणूक काढली व गावभर पेढे वाटले आहेत.शुभमच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने शुभम च्या घरी जाऊन शुभमचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी बोलताना शिक्षक संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी वाझरचे सुपुत्र मारुती शिरतोडे म्हणाले की ग्रामीण भागात मुलांच्यात टॅलेंट खूप मोठ्या प्रमाणात दडलेले असून पालकांनी मुलांना योग्य ते वळण,चांगल्या सवयी, नियमित अभ्यास याकडे लक्ष दिल्यास शुभम सारखी अनेक मुलं आपल्या जीवनात नक्कीच यश पादाक्रांत करतील. तर शुभम ने ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास,विद्यार्थ्यानी व्यसनापासून दूर राहिल्यास आणि दररोज ठराविक वेळेत अभ्यास व आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास आपल्याला हवे ते साध्य करता येऊ शकते असे सांगून आई-वडिलांचे कष्ट आणि ज्या मातीने मला घडवले ती माती मी कधीच विसरणार नसून वर्ग 1 चा अधिकारी म्हणून काम करताना सर्वसामान्य माणसाच्या जीवनात उजेड निर्माण करण्यासाठी निश्चित चांगल्याप्रकारे काम करेन अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक तथा शिक्षक समितीचे नेते बाबासाहेब लाड, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण, शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हा पदाधिकारी नितीन चव्हाण, शिक्षक भारतीचे जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे, शिक्षक समितीचे लक्ष्मण शिंदे ,माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव,शुभमचे वडील सुधीर जाधव,आई सौ.वैशालीताई आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!