‘ज्ञानसागर’च्या विद्यार्थ्यांचे दक्षिण कोरियात यश

दक्षिण कोरियात देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या विद्यार्थ्यांना बोर्ड परिक्षेत १५ वाढीव गुण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२३ | बारामती |
बारामती तालुक्यातील सावळ येथील ज्ञानसागर गुरूकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दक्षिण कोरियामध्ये ‘आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरी-२०२३’ मध्ये सहभाग घेतला.

दि. १ ते १० ऑगस्ट २०२३ दरम्यान दक्षिण कोरिया या देशात २५ वी आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरी-२०२३ पार पडली. या आंतरराष्ट्रीय जांबोरीचे उद्घाटन दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सीओक योल यांच्या हस्ते संपन्न झाले. यात जपान, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, चीन, जर्मनी, फ्रान्स, इटली, तैवान, स्वीडन, स्वित्झर्लंड, नागालँड असे एकूण ५८ देशातील ४८ हजार स्काऊट आणि गाईड सहभागी झाले होते.

या जांबोरीत सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा, परेड रॅली, शारीरिक कसरत प्रात्यक्षिके, कुकींग असे अनेक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते भारत देशाचे सांस्कृतिक कार्यक्रम. यामध्ये विशेषतः महाराष्ट्रातून बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, सावळ या शाळेतील सात विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील नृत्य आविष्काराचे उत्कृष्ट सादरीकरण केले होते. या आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरीत सहभागी विद्यार्थी भावना रावत, आदित्य चव्हाण, दिव्या आटोळे, संस्कार रायते, स्वयम कुंभार, प्रणव भरणे, अर्थव खताळ या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

या यशाबद्दल स्काऊट मास्टर प्रा. सागर आटोळे व सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक केले.

आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरी ही स्पर्धा दर पाच वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्काऊट कमिशनर मधुसूदन सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

अशा आंतरराष्ट्रीय स्काऊट जांबोरीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त ज्ञानसागर गुरुकुलमधील या सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या उल्लेखनीय कार्याबद्दल संपूर्ण देशामध्ये या शाळेचे, विद्यार्थ्यांचे व संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर मानसिंग आटोळे व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे कौतुक करण्यात येत आहे.

दक्षिण कोरियामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने इ. १० वी व इ. १२ वीच्या बोर्ड परिक्षेत १५ वाढीव गुण दिले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. सागर आटोळे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!