राज्याच्या विकासात महिलांचे भरीव योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । १२ मार्च २०२३ । पालघर । आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले भरीव योगदान देतानाच आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विश्वास फाउंडेशन यांनी आयोजित केलेला महिला मेळावा चाहडे (पालघर) येथे संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी आमदार रवींद्र फाटक (दूरदृश्य प्रणाली ) पद्मश्री राहीबाई पोपेरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास वळवी तसेच वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा महिलांनी गाजविलेल्या शौर्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,
रमाबाई रानडे यांनी समाजासाठी योगदान देताना संघर्ष केला आहे. त्यांच्या संघर्षातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळत आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय जीवनात स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे कायदे करण्यात येणार असून सर्वसमावेशक आदर्श असे महिला धोरण राज्य शासन लवकरच जाहीर करणार आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रंगाच्या कार्डधारक कुटुंबातील मुलींना याचा फायदा होणार आहे. मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, पहिल्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यावर 4 हजार रुपये, इयत्ता सहावी मध्ये 6 हजार रुपये, 11 वी मध्ये प्रवेश घेतल्या नंतर 8 हजार रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 75 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पूर्वी नोकरी करणाऱ्या महिलांना 10 हजार रुपयांच्यावर उत्पन्न गेल्यास व्यवसाय कर भरावा लागत होता. या कराची व्याप्ती वाढवून 25 हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे 25 हजार उत्पन्न असणाऱ्या महिलांना व्यवसाय कर भरावा लागणार नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये 50 % सवलत महिलांना देण्यात आली आहे. महिला बचत गटासाठी ई-बिझनेस प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला असून विशेष जलद गती न्यायालयांना पदाची मान्यता देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 4 कोटी 50 लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी 11 जिल्ह्यामध्ये जन सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच राज्यामध्ये विविध ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले असून ठाणे जिल्ह्यामध्ये 60 हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!