दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । मुंबई । वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नळ पाणी योजनेसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेमधून 7 कोटी 15 लाख निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधितांना दिले. याबाबत नगरविकास विभागाशी चर्चा करुन यावर मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन श्री. सामंत यांनी दिले.
वैभववाडी नळ पाणी योजनेच्या कामाला प्राधान्य देऊन या कामाला जलद गतीने सुरुवात करा, असे निर्देशही श्री. सामंत यांनी दिले.
वैभववाडी नगरपंचायत जिल्हा सिंधुदुर्ग कार्यक्षेत्रातील नळ पाणी योजनाबाबत आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुख्य अभियंता श्री. नंदनवरे, श्री. गजभिये, कार्यकारी अभियंता श्री. वानखेडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले की, वैभववाडी नळ पाणी योजनासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून 7 कोटी 15 लाख निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा उरलेला निधी याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. उरलेली रक्कम जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून देण्यात येईल असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
देवगड नगरपंचायतीच्या लोकसंख्येच्या तुलनेत लागणारा निधी कमी करुन त्याबाबतचा प्रस्तावाचे पुनर्विलोकन करुन तातडीने सादर करावा, असे ही श्री. सामंत यांनी सांगितले.