“सुभाष शिंदे” म्हणजे यशवंतराव ‘स्कूल’चे आदर्श विद्यार्थी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 15 मार्च 2024 | पुणे | फलटणचे एक अत्यंत सुसंस्कृत राजकीय नेता, खऱ्या अर्थानं तळागाळातल्या समाजाशी एकरूप होऊन काम करणारं व्यक्तिमत्व, सुभाषराव शिंदे काल आपल्यामधून गेले. ते केवळ ७७ वर्षांचे होते. माझे आणि त्यांचे ऋणानुबंध दीर्घकाळचे आणि स्नेहाचे होते.

फलटणशी तर माझे ऋणानुबंध मुळी पिढ्यानपिढ्यांचे म्हणावे लागतील. माझे आजोबा, म्हणजे आईचे वडील, मूळचे अकलूजचे. पण त्यांची मुख्य सेवा फलटणमध्ये झाली. त्या अर्थानं फलटण माझं आजोळ. प्रत्येक उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीत आजीआजोबांच्या घरी आम्ही सगळे मामा, मावशी आणि भावंडं जमून धमाल करत असू. लहानपणापासूनच्या माझ्या अशा अतिशय आनंददायी आठवणी फलटणशी जुळलेल्या आहेत.

म्हणून, मी तर माझं भाग्यच समजलो की आयएएसमध्ये निवड झाल्यानंतर, प्रशिक्षण पूर्ण करून मला पहिली पदस्थापनाच मिळाली फलटण इथं. सहाय्यक जिल्हाधिकारी, फलटण. अर्थात, कुठल्याही प्रकारे न मागता. आनंदानं रुजू झालो. कामाला सुरुवात झाल्यावर पहिल्या काही दिवसांमध्येच महत्त्वाच्या नेत्या-कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतात, तशी सुभाषराव शिंदे यांची भेट झाली. त्यावेळी ते फलटण दूध संघाचे अध्यक्ष होते. साध्या पांढऱ्याशुभ्र पायजमा-कुर्त्यात वावरणारं एक प्रसन्न आणि शिडशिडीत, टवटवीत व्यक्तिमत्व.

थोड्याच दिवसांमध्ये माझ्या कोर्टात सुनावणीला असलेल्या एका ‘केस’बाबत त्यांनी मला दोन-तीन निरोप पाठवले. कोर्टात सुनावणीची केस म्हणजे तिथलं माझं काम कार्यकारी न्यायाधीशाचं. तिथं अर्थात कागदपत्रं, साक्षीपुरावे आणि कायद्याला साक्ष राहून, शुद्धबुद्धीनं ‘दूध का दूध और पानी का पानी’ असा न्याय करणं हे माझं कर्तव्य. अशा प्रकारच्या न्यायालयीन कामकाजात असे काही निरोप पाठवणं, हे तसं कामकाजाच्या नैतिकतेला धरून नाही. नेमका शब्द वापरायचा तर तो मराठीतला साधा-सरळ शब्द आहे – राजकीय ढवळाढवळ!

माझ्या कोर्टात ज्या केसची सुनावणी होती, त्यातला एक पक्ष सुभाषराव शिंदे यांच्या कार्यकर्त्याचा होता. म्हणून त्यांचे वेगवेगळ्या मार्गानं निरोप होते, की ‘थोडं बघा, हा माझा कार्यकर्ता आहे’.

असं तीन-चारदा झाल्यावर मी त्यांच्याच एका कार्यकर्त्याला सुभाषराव शिंदे यांच्यासाठी निरोप दिला. तो होता की, ‘तुम्ही लोकांची हवी तेवढी कामं मला सांगा. सार्वजनिक हिताचे मुद्दे घेऊन हवे तेवढे मला भेटा. ती कामं मी आनंदानं करिन. पण कोर्टात सुनावणीला असलेल्या ‘केस’बाबत ढवळाढवळ करू नका.’

मी हा निरोप दिल्यानंतर मध्ये दोन-तीन दिवस गेले आणि मला थेट सुभाषराव शिंदे यांचाच फोन आला. म्हणाले – ‘साहेब, आपल्याला भेटायचं आहे.’ अर्थातच मी त्यांना अग्रक्रमानं वेळ दिली. अंदाज होता की आता बहुदा चकमक होणार. मी कोण आहे माहितीये का! तुमची मी इथून २४ तासांत बदली करू शकतो…वगैरे वगैरे!! अर्थात त्यासाठी माझी मनाची तयारी होतीच. प्रशासकीय भाषेत सांगायचं तर बदलीसाठी बॅग कायम भरलेलीच असायची!

यशवंतराव ‘स्कूल’चे आदर्श विद्यार्थी

फलटणचे एक अत्यंत सुसंस्कृत राजकीय नेता, खऱ्या अर्थानं तळागाळातल्या समाजाशी एकरूप…

Posted by Avinash Dharmadhikari on Thursday, March 14, 2024

ठरल्यावेळी सुभाषराव शिंदे आले. मी अर्थातच त्यांचं मनापासून स्वागत केलं. चहा-कॉफी-बिस्किट किंवा ड्रायफ्रूट विचारलं आणि समोर ठेवले. पहिल्या ज्या थोड्या स्वागताच्या, ख्यालीखुशालीच्या गप्पा होतात, त्या झाल्या. मी वाट बघत होतो की ‘फटाके फुटणं’ केव्हा चालू होतंय. अशी एक वेळ आल्यावर मी माझ्या खुर्चीत शांत थांबलो. सुभाषराव शिंदे म्हणाले, ‘साहेब, तुमचा निरोप मिळाला. तुमच्या निरोपाचं स्वागत आहे. उलट मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो की यापुढंदेखील आमच्याकडून असं काही घडलं, तर थेट मलाच निरोप दिला तरी चालेल!’ आता ही शालीनता आणि सुसंस्कृतता त्या क्षणी तरी मला काहीशी अनपेक्षित होती. बहुदा ते माझ्या चेहऱ्यावर दिसलं असावं. सुभाषराव शिंदे यांच्याही ते लक्षात आलं. ते प्रसन्नपणे हसून म्हणाले, ‘साहेब, आम्ही यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. साहेबांची शिकवण आहे की सरकारी अधिकाऱ्याला त्याचं काम नि:पक्ष करू दिलं पाहिजे.’

ते पुढं म्हणाले, ‘आम्हीदेखील राजकारणात वावरणारे आहोत. आम्हालाही माणसं सांभाळून घ्यायची असतात. कार्यकर्ते टिकवायचे असतात. म्हणून निरोप दिले. पण त्याचा अर्थ आम्ही कोणता दबाव किंवा उर्मटपणा करू असा होत नाही.’ ते हे सर्व म्हणत असताना मलासुद्धा आठवलं, की यशवंतराव चव्हाण यांची सरकारी अधिकाऱ्यांना सूचना-मार्गदर्शन असायचं, की तुमचं काम तुम्ही स्वच्छ आणि परखडपणे करा. राजकीय नेतृत्वालासुद्धा परखड आणि नि:पक्षपाती सल्ला देणं हे सरकारी अधिकाऱ्याचं काम आहे. स्वतः यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात किंवा केंद्रातही असेच परखड आणि कार्यक्षम अधिकारी जवळ केले होते. असे काही वरिष्ठ मला माहित होते आणि मीही अशा अधिकाऱ्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं होतं.

१९८८ च्या सप्टेंबर महिन्यात, फलटणमध्ये, सुभाषराव शिंदे यांच्या तोंडून हे सर्व ऐकताना, माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली – सुसंस्कृत आणि शालीन राजकारणाची यशवंतराव चव्हाण ‘स्कूल’! तेव्हापासून ते थेट कालपर्यंत दिसत राहिले, त्या ‘स्कूल’चे एक आदर्श विद्यार्थी, कार्यकर्ता, नेता असलेले सुभाषराव शिंदे. त्यांच्या स्मृतीला माझं अभिवादन.

(निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या फेसबुक वॉलवरून)

Back to top button
Don`t copy text!