
दैनिक स्थैर्य । 28 एप्रिल 2025। विडणी । येथील नुतन स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संधीचे सोने करावे असे मत उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव धीरज अभंग यांनी केले. ग्रामपंचायतीच्यावतीने नूतन स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा व मोफत आरोग्य शिबिराच्या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. जे. टी. पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमिता गावडे, अंकुश नाळे, प्रा. के. ननावरे, प्रा. डी. एन. शिंदे, सरपंच सागर अभंग, अनिल शेंडे, डॉ. प्रवीण अभंग, कुंदन शेंडे, योगेश इंगळे, प्रदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
धीरज अभंग म्हणाले , याठिकाणी पोहोचण्यासाठी मला अनेकदा संघर्ष करावा लागला. सर्वांनाच अभ्यासासाठी मोठ्या शहरात जाता येत नाही. तो संघर्ष याठिकाणच्या विद्यार्थ्यांना करावा लागू नये तसेच गावांमध्येच स्पर्धा परीक्षा अभ्यास करता यावा या हेतूने विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण 23 विद्यार्थी विविध स्पर्धातून विविध क्षेत्रात नियुक्त झाले आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. भविष्यात गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत होण्याच्या हेतूने ’उमेद’ चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात येणार आहे. भविष्यात लवकरच ती कार्यान्वित होईल. सध्या विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेच्या पुरेपूर वापर करून करिअर घडवावे.
डॉ. जे. टी. पोळ म्हणाले, गावात स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध करून एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. अधिकार्यांचा गाव म्हणून या गावाची ओळख निर्माण झाली आहे. धीरज अभंग व त्यांचे सर्व सहकारी विविध उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. दरम्यान स्पर्धेच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मोबाईलचे व्यसन आरोग्यासाठी घातक ठरत असून याचा कामापुरता वापर करावा. विद्यार्थ्यांनी आपले शरीर स्वास्थ ठेवायचे असेल तर सर्वच व्यसनापासून दूर राहावे. असंतुलित जीवनशैलीमुळे हृदयविकार व मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम व योगासने यावर लक्ष द्यायला हवे.
सरपंच सागर अभंग म्हणाले, गावामध्ये सर्वांच्या सहकार्याने सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आनंद वाटत आहे. दुर्दैवाने गावात यात्रेनिमित्त डॉल्बीचा दणदणाट खूपच होता. दरवर्षी लाखो रुपयांचे उधळण या डॉल्बीवर होत आहे. गावातील अनेक विचारवंत व ग्रामस्थांच्यावतीने याविषयी वारंवार नाराजी व्यक्त होत आहे. यात्रा कमिटी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरच डॉल्बी बंदी, व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेण्यात येईल. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
विडणी ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील विविध शाळांना वॉटर कुलर प्युरिफायरचे वाटप करण्यात आले. विविध पदांवर नियुक्त झालेले मयूर नाळे, विदुला देशपांडे, डॉ. हिमांशू बोडरे या अधिकार्यांचा तसेच राष्ट्रीय प्रधान मुखिया संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकांना लस्सीचे वाटप करण्यात आले. प्रा. सचिन अभंग यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र परमाळे यांनी सूत्रसंचालन केले.