दैनिक स्थैर्य | दि. 26 डिसेंबर 2023 | वाई | द्रविड बंधू आणि कुटूबियांचे स्मरण या प्रसंगी करून सगळ्यात आनंदाचा आणि मोठा क्षण आज असल्याचे सांगितले. शालेय जीवनातील निवडणुकीची आठवण या प्रसंगी सांगून अनेक आठवणी खुमासदार शैलीत सांगितल्या. वेळ आणि अचूकता साधून विद्यार्थ्यांनी यश मिळवण्याचा सल्ला दिला. वेळ आणि जागा यांना भविष्यात अतिशय मोल असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी जागा, वेळ याबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत यावेळी जेष्ठ पत्रकार मधुसूदन पत्की यांनी व्यक्त केले.
वाई येथे दि. 23 डिसेंबर 2023 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन पतकी हे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून डॉ. संजीव गोखले, शाळाप्रमुख सौ. दर्शना कोरके, पर्यवेक्षक श्री वैद्य, पालक संघाचे सौ. प्रीती महाबळेश्वरकर ह्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्रप्रदर्शन कक्षाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मधुसूदन पतकी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या माध्यमातून साकारलेल्या चित्रकृती मांडण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन, द्रविड प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
त्यानंतर संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी ‘शारदे, तुझेच गातो गान’ आणि ‘करू स्वागत हे प्रेमभराने’ ही गीते सादर केली.
प्रास्तविक भाषणातून बोलताना सौ. कोरके यांनी शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली.
अभ्यास, कला व क्रीडा प्रकारात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यांनतर श्री वैद्य सर यांनी प्रमुख पाहुणे मधुसूदन पतकी, आणि डॉ. गोखले यांचा परिचय करून दिला. मान्यवरांचे स्वागत पुस्तक भेट देऊन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
देणगीदारांनी ठेवलेल्या देणगीतून अभ्यासात आणि विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. शालांत परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक या प्रसंगी करण्यात आले. तसेच क्रीडा स्पर्धा, एनसीसी विभाग आणि कला या विभागातील उज्ज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार जाधव, आदर्श गणित शिक्षक लिमये, आदर्श विज्ञान शिक्षक मोतेसरदार, आदर्श क्रीडा शिक्षिका सौ. गुरव, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी तनपुरे यांना देण्यात आला.
त्यानंतर व्यवसाय शिक्षण विभागातील अकरावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी शालेय जीवनाची आठवण करून देणारी कविता सादर करून आपल्या भावनांना व्यक्त केले. कायम जिज्ञासा जागृत ठेवून योग्य प्रश्नांची सोडवणूक विद्यार्थ्यांनी करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. संजीव गोखले यांनी विद्यार्थ्यानी प्रयत्न करून शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.