दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नुकतेच चंद्राच्या दक्षिण धु्रवावर ‘चंद्रयान-३’ यशस्वीरित्या उतरवून इतिहास रचला आहे. याचा सर्व भारतीयांना अभियान असून वडले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही शिक्षणात लक्ष देऊन स्वतःबरोबर देशाचीही प्रगती करावी व भारत देशाचे नाव जगात उंचवावे, असे प्रतिपादन जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सविता दोशी यांनी केले.
जैन सोशल ग्रुप फलटणच्या वतीने जैन सोशल ग्रुप्स् इंटनॅशनल फेडरेशन सप्ताह व फलटण एज्युकेशन सोसायटी वर्धापन दिनाचे औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित वडले हायस्कूल येथील २५ विद्यार्थ्यांना जैन सोशल ग्रुपच्या वतीने अध्यक्षा सौ. सविता दोशी, सचिव प्रीतम शहा, खजिनदार समीर शहा, उपाध्यक्ष श्रीपाल जैन यांच्या हस्ते शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जैन सोशल ग्रुपचे सचिव प्रीतम शहा, खजिनदार समीर शहा, उपाध्यक्ष श्रीपाल जैन, मेंबरशिप ग्रोथ चेअरमन डॉ. अशोक व्होरा, संचालक डॉ. मिलिंद दोशी, साप्ताहिक आदेशचे संपादक विशाल शहा, रामआदेशचे संपादक बापूराव जगताप, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक यादव सर उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ. सविता दोशी म्हणाल्या, जैन सोशल ग्रुप फलटण हा नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतो. वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पालखी सोहळ्यात वारकर्यांना अन्नदान, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यामाध्यमातून जैन सोशल ग्रुप समाजासाठी कार्यरत आहे. वडले हायस्कूल, वडले येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यास मिळाले, त्याबद्दल संस्थेचे मी आभार मानते. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता अभ्यासात लक्ष देऊन, आपल्या कुटुंबाबरोबरच देशाचेही नाव मोठे करण्याचे आवाहन सौ. सविता दोशी यांनी यावेळी केले.
जैन सोशल ग्रुप फलटण ही संस्था सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असते. ग्रुपने वडले विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांची साथ नेहमीच विद्यालयाला मिळेल, अशी सदिच्छा विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक यादव सर यांनी व्यक्त केली. तसेच या उपक्रमासाठी योगदान दिल्याबद्दल जैन सोशल ग्रुपचे आभार मानले.
बापूराव जगताप यांनी आमच्याकडे वडले हायस्कूल येथील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यासाठी संपर्क साधला असता, हा एक चांगला उपक्रम असल्याने आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून जैन सोशल ग्रुपच्या वतीने सर्वांच्या सहमतीने केवळ चार दिवसात याचे नियोजन केले. जैन सोशल ग्रुप इंटनॅशनल फेडरेशन सप्ताह व फलटण एज्युकेशन सोसायटी वर्धापनदिनाचे औचित्य साधून २५ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, त्याबद्दल सचिव प्रीतम शहा यांनी विद्यालयाचे आभार मानले.
श्रीपाल जैन यांनी प्रास्ताविक करताना जैन सोशल ग्रुप फलटणच्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्रथमतः विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य यादव सर यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
सूत्रसंचालन कुमार सोनवलकर सर यांनी केले. आभार जैन सोशल ग्रुपचे सचिव प्रीतम शहा यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.