दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ ‘इंद्रधनुष्य’ २०२३-२४ करिता शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे, ही अभिमानाची व कौतुकाची बाब आहे. सदर संघात ओम पोपट शिंदे व ओंकार राजेंद्र दाणे यांची लोकसंगीत वाद्यवृंद या कलाप्रकारासाठी निवड झाली तर गुरुनाथ म्हातुगाडे याची मातीकाम व व्यंगचित्र व सांघिक रचनाकृती या कलाप्रकारासाठी तसेच अश्विनी वालकोळी हिची भित्तीचित्र, सांघिक रचनाकृती व सांस्कृतिक रॅली या कलाप्रकारासाठी निवड झाली असून हे विद्यार्थी ५ ते १० नोव्हेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे होणार्या ‘इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवात सहभागी होणार आहेत.
सदर विद्यार्थ्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थ्यांना कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर सरांचे तसेच समिती सदस्य प्रा. विशाल गायकवाड, प्रा. प्रशांत शेट्ये, प्रा. प्रियंका देशमुख, प्रा. गायत्री पवार, प्रा.मोनिका शेंडे व प्रा. स्वरूप अहिवळे यांचे मार्गदर्शन लाभले.