किर्गिजस्तान मधील येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चार्टर्ड विमानाद्वारे भारतात परत येण्यासाठी परवानगी मिळावी : खासदार डॉ. अमोल कोल्हे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि. २६ : लॉकडाऊनमुळे किर्गिजस्तानमधील बिश्केक (Bishkek) येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना चार्टर्ड विमानाद्वारे भारतात परत येण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले असून विद्यार्थ्यांची पहिली तुकडी काल दिल्ली विमानतळावर दाखल झाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर युक्रेन, रशिया प्रमाणेच किर्गिजस्तानमधील बिश्केक येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपल्यापासून ते सातत्याने भारतात परतण्यासाठी मदतीची विनंती करीत होते. लॉकडाऊन शिथिल होताच या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्याशी मोबाईल, फेसबुक व ई-मेल आदी माध्यमातून मदतीसाठी संपर्क साधला होता.

खासदार डॉ. कोल्हे विद्यार्थ्यांच्या विनंतीची तत्परतेने दखल घेऊन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी संपर्क साधून ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत बिश्केक ते मुंबई/दिल्ली दरम्यान फ्लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. दरम्यान या मुंढवा येथील नगरसेविका कोंद्रे यांचा नातेवाईक असलेल्या सुमेध गायकवाड याने आम्ही चार्टर्ड विमानाने येण्यास तयार आहोत आम्हाला केंद्र व राज्य शासनाची परवानगी मिळावी यासाठी मदत करण्याची मागणी केली. त्यानुसार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र पाठवून परवानगी देण्याची विनंती केली.

राज्य सरकारकडून परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याचे दिसताच डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांना पत्र पाठवून दिल्ली अथवा अन्य विमानतळावर चार्टर्ड विमान उतरवण्यास परवानगी देण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बिश्केक येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार काल पहिली बॅच दिल्लीत दाखल झाली. अद्याप बरेच विद्यार्थी बिश्केक, किर्गिजस्तान येथे अडकलेले असून आणखी फ्लाईट उपलब्ध होणार असल्याने दि. ५ ते १० जुलैपर्यंत सर्व विद्यार्थी भारतात परततील.

भारतात परत यायचे निश्चित होताच सुमेध गायकवाड याने खासदार डॉ. कोल्हे यांना ई-मेल वर ही आनंदाची बातमी देऊन आभार मानले. तसेच आभार व्यक्त करणारा एक व्हिडिओही पाठवला आहे.

अजूनही अनेक विद्यार्थी रशिया, युक्रेनमध्ये अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी परत येईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करणार असून माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदत करण्याची संधी मिळाली आणि त्यांना त्यांच्या घरी परत येण्यासाठीचे माझे प्रयत्न यशस्वी झाले याचा मला विशेष आनंद झाला असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!