धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । 18 मे 2025। सातारा । इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजाच्या विदयार्थ्यांकरीता शहरातील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत सातारा जिल्हयामध्ये गुरुकृपा कॉन्व्हेंट स्कूल, पाचगणी, ता. महाबळेश्वर, पाचगणी इंटरनॅशनल स्कूल, पांचगणी, ता. महाबळेश्वर व ब्लू डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल, लोणंद, ता. खंडाळा या तीन शाळांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. तरी या शाळांमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक डॉ. कांचन जगताप यांनी केले आहे.

2025-26 वर्षाकरीता सदर शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून प्रवेशाकरीता अर्जासोबत विदयार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड व पालकांचे रक्कम रु. 1 लक्षच्या मर्यादेतील उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश प्राप्त झालेल्या विदयार्थ्यांना निवास, भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य इ. सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. तसेच विदयार्थ्यांना सदर शाळांमधील अन्य प्रवर्गाच्या विदयार्थ्यांसमवेत एकत्रितपणे शिक्षण दिले जाणार आहे. तसेच शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या इ. 1ली ते 8वी च्या विदयार्थ्यांकरीता प्रवेश मंजूर करण्यात येईल व पुढे इ. 12 वी पर्यंत मोफत शिक्षणाचा लाभ अनुज्ञेय राहिल.

तरी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी धनगर प्रवर्गातील इ. 1 ली ते 8 वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विदयार्थ्याच्या प्रवेशाकरीता त्यांच्या पालकांनी 15 जून पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.


Back to top button
Don`t copy text!