फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी; सुमारे १३ लाखांचे ७४ गहाळ मोबाईल केले हस्तगत


स्थैर्य, फलटण, दि. ०८ सप्टेंबर : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने एका विशेष मोहिमेअंतर्गत, सन २०२५ मध्ये गहाळ झालेले तब्बल १२ लाख ७० हजार रुपये किमतीचे ७४ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यांमधूनही या मोबाईलचा शोध घेण्यात आला असून, पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सी.ई.आय.आर. (CEIR) पोर्टल आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे या मोबाईलचा शोध सुरू केला होता. तपासात अनेक मोबाईल राज्याच्या इतर जिल्ह्यांसह परराज्यात वापरात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी संबंधित वापरकर्त्यांशी संपर्क साधून कुरिअर व इतर मार्गांनी हे मोबाईल परत मिळवले.

या मोहिमेअंतर्गत जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत एकूण ७४ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. विशेषतः मागील ऑगस्ट महिन्यातच ३९ मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. हस्तगत केलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उप-अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकामध्ये पोलीस उप-निरीक्षक जी.पी. बदने, पोलीस हवालदार नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, अमोल जगदाळे आणि हनुमंत दडस यांचा समावेश होता.


Back to top button
Don`t copy text!