स्थैर्य, कराड, दि. 12 : लॉकडाऊनच्या काळात 21 मार्च ते 30 जून अखेर कराड शहर व परिसरात वाहतुक शाखेने पोलिसांच्या निर्देशाचे पालन न करणे, विना परवाना वाहन चालविणे, ट्रीपल सीट, वाहन चालविताना मोबाईल संभाषण करणे, नो पार्किंग, फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट नसणे अशा 24 हजार 204 वाहनांवर कारवाई करून 50 लाख 12 हजार 700 रूपयांचा दंड जमा केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधिक्षक सूरज गुरव रांच्रा मार्गदर्शनाखाली लॉकडाऊनच्या काळात कराड वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे व वाहतूक पोलीस कर्मचार्यांनी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये जुलै महिन्याच्या 1 तारखेपासून 11 जुलैपर्यंत पोलिसांच्या निर्देशाचे पालन न करणे 5573 केसेस, विना परवाना वाहन चालविणे 31, ट्रीपल सीट 41, वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे 70, नो पार्किंग 179, फॅन्सी नंबर प्लेट व नंबर प्लेट नसणे 135 व इतर अशा 7 हजार 188 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 14 लाख 91 हजाराचा दंड वसूल केला आहे.
शहर व परिसरात अनेक वेळा दागिने हिसकावून घेणे किंवा मोबाईल लंपास करणारे गुन्हेगार हे फॅन्सी नंबर प्लेट किंवा नंबर प्लेट नसणारे वाहन वापरतात व अशी वाहने गुन्हा करणताना वापरल्यामुळे अशा गुन्हेगारांचा शोध घेता येत नाही. या कारणाने असे गुन्हे रोखता यावे यासाठी फॅन्सी नंबर प्लेट किंवा नंबर प्लेट नसणार्या वाहन चालकांकडून त्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेट जागीच दुरूस्त करून वाहतुक शाखेने घेतल्या आहेत. तसेच वाहन चालविताना मोबाईलवर बोलत स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याने अशा वाहन चालकांचे परवाने निलंबीत करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. तसेच शहरात वाहतुकीस अडथळा होईल किंवा नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणार्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आल्या आहेत.