ग्रामीण भागातील साहित्यिकांसाठी प्रयत्नशील राहणार : रविंद्र बेडकिहाळ; महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ‘मसाप’ च्यावतीने सत्कार संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२१ । फलटण । ‘‘महाराष्ट्रातील नवोदित लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हावार कार्यशाळा घेण्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उद्दिष्ट आहे. तसेच प्रथम पुस्तकासाठी या नवलेखकांना प्रोत्साहित करणे यासाठी हे मंडळ प्रयत्नशील राहणार आहे. आपण या मंडळातील सदस्यपदाच्या माध्ममातून सातारा जिल्ह्यातील, विशेषत: ग्रामीण भागातील साहित्यिक व नवसाहित्यिक यांच्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्नशील राहू’’, असे प्रतिपादन राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवनियुक्त सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी केले.

येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेतर्फे रविंद्र बेडकिहाळ यांचा वरील निवडीबद्दल शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी बेडकिहाळ बोलत होते.

‘‘ज्या लेखकांना प्रकाशक मिळत नाहीत अशांकरिता त्यांची पुस्तके या मंडळामार्फत प्रकाशित करण्यासाठी आपण प्रयत्न करु’’, असे सांगून बेडकिहाळ म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचे शिल्पकार या मंडळाच्या विशेष प्रकाशन मालिकेत आपण कै.श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार शरद पवार, ग्रामीण व शहरी शिक्षण संस्कृतीसाठी आगळेवेगळे भारती विद्यापीठ उभारणारे डॉ.पतंगराव कदम, मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ, मराठी भाषेसाठी सातासमुद्रापलिकडून फलटणला मराठी भाषा अभ्यास व शिक्षण यांचे केंद्र बनविणार्‍या मॅक्सिन बर्नसन अशांची चरित्रे प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करु. पण त्यासाठी नवीन अभ्यासू लेखकांनी पुढे आले पाहिजे’’, अशी अपेक्षाही बेडकिहाळ यांनी यावेळी व्यक्त केली.

‘‘महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक व मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचेही नवीन संशोधित चरित्र जांभेकरांच्या यावर्षीच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी पुण्यतिथी वर्षानिमित्त नव्या पिढीसमोर आणण्यासाठीही आपण स्वत: प्रयत्नशील आहोत. तसेच फलटण महाराष्ट्र साहित्य परिषद दरवर्षी आयोजित करीत असलेल्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनासाठीही या मंडळामार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न राहील’’, असेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.

प्राचार्य शांताराम आवटे म्हणाले, ‘‘रयत शिक्षण संस्थेचे सदस्य असलेले रविंद्र बेडकिहाळ यांची ही निवड रयत शिक्षण संस्था तसेच सातारा जिल्ह्याला व विशेषत: फलटण तालुक्याला अभिमानास्पद अशी आहे. औंधचे राजे पंतप्रतिनिधी यांचे चरित्रही नव्या पिढीसमोर येण्यासाठी या मंडळाच्या माध्यमातून बेडकिहाळ यांनी प्रयत्न करावेत.’’

प्रारंभी मसाप शाखा कार्यवाह ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविक केले व ‘‘रविंद्र बेडकिहाळ यांच्या या पदाचा फायदा सातारा जिल्ह्यातील मसाप शाखा व साहित्यिकांना निश्‍चितपणे होईल’’, असा विश्‍वास व्यक्त केला. मसाप कार्यवाह अमर शेंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मसाप शाखा उपाध्यक्ष डॉ.माधुरी दाणी, कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, ज्येष्ठ सदस्य प्रा.शरद इनामदार, भिवा जगताप उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!