
सातारा, दिनांक, दि. 12 : दिनांक 13 जुलै पासून जिल्हा परिषद कार्यालय संदर्भात जाहीर केलेली नियमावली कडकपणे पाळावी, असे आवाहन पत्रकाद्वारे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी केले आहे. विषाणूंचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून रुग्णांची संख्या वाढत आहे. ती साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये होणारी गर्दी पाहता ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेची मुख्य इमारत आणि विस्तारित इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी आणि अभ्यागत यांच्यासाठी मुख्य इमारतीचा एकच मार्ग उघडा ठेवण्यात येणार आहे. पर्यायी सर्व मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच; अधिकारी, पदाधिकारी आणि शासकीय कर्मचारी यांच्याच वाहनांना जिल्हा परिषद आवारात प्रवेश दिला जाणार आहे. इतर सर्व खाजगी वाहनांना प्रवेशास बंदी राहील.
प्रत्येकाजवळ आयकार्ड असणे बंधनकारक असणार आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच गेट चालू ठेवण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणेच थर्मल तपासणी आणि सॅनिटायझर प्रवेशद्वारावरच बंधनकारक आहे. प्रवेशद्वारातच तळमजला येथे टपाल व्यवस्था करण्यात आली आहे. या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची दिवसानुसार विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीतील कोणत्याही विभागाचे टपाल तिथेच स्वीकारले जाईल. तालुका विभागाचे टपाल संबंधितांना तेथेच देण्यात येईल. इमारतीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हा परिषदेमधील विविध कार्यालयाकडे येणारे पोस्टाचे टपाल तसेच; अभ्यागतांनि समक्ष दिलेले अर्ज येथे स्वीकारण्यात येतील. अत्यंत महत्त्वाचे टपाल असेल तरच टपाल आणावे असे देखील नमूद करण्यात आले आहे. एखाद्या विभागात काही काम असेल तर कामाचे स्वरूप, विभागाचे नाव, दूरध्वनी क्रमांक इत्यादी मजकूर लिहून तो कागद प्रवेशद्वारावरील टपाल व्यवस्थेमध्ये जमा करावा. त्या नागरिकाला त्याच्या कामासंदर्भात संबंधित अधिकारी आणि कर्मचारी स्वतः दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करतील. या संपूर्ण नियमावलीची काटेकोरपणे तत्काळ अंमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांनी या सर्व नियमांची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे देखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे.