जिल्ह्यामध्ये आजपासून पीओपी मूर्तींवर कडक बंदी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । सातारा ।  सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्यावर कडकडीत बंद लादण्यात आले आहेत. जर कोणी पीओपीच्या मुर्त्या करताना सापडले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे त्यामुळे पीओपी मूर्ती बनवणारा कारागीर यांना तब्बल 15 कोटी रुपयांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पीओपी बंदीची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पर्यावरण पूरक गणेश उत्सव ही घोषणा दरवर्षी सातारा जिल्ह्यामध्ये होते. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे यंदा राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या आदेशानुसार पीओपी मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांवर आणि त्याच्या कच्च्या मालावर प्रत्यक्षात बंदी घालण्याचे सूतोवाच करून या निर्णयाची अंमलबजावणी बुधवार दिनांक 6 जुलै पासून करण्याचे कडक धोरण स्वीकारले आहे. या संदर्भातील शासकीय अध्यादेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. यासंदर्भात पीओपी मूर्ती संघटनेच्या काही सक्रिय सदस्यांची चर्चा केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास पीओपी मूर्ती बनवणारे 30,000 कारागीर असून गेल्या वर्षीच्या तब्बल साडेपाच लाख पीओपीच्या मूर्ती शिल्लक आहेत. त्यामुळे या मुर्त्या दर तशाच पडून राहिल्या त्या संदर्भात कारागिरांनी केलेली गुंतवणूक वाया जाणार असून या पीओपी बंदीचा तब्बल 15 कोटी रुपयांचा फटका जिल्ह्याला बसणार आहे.

कोरोनाच्या काळामध्ये गेल्या दोन वर्षापासून कारागिरांची अत्यंत आर्थिक दृष्ट्या वाईट परिस्थिती आहे. यासंदर्भात काहीतरी सुवर्णमध्य काढला जावा किंवा पर्यावरण पूरक मूर्ती बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तू योग्य भावामध्ये उपलब्ध व्हावा अशी मागणी किरण राजे यांनी केली आहे.

पीओपीच्या मूर्ती मुळे होणारे जलप्रदूषण ही मोठी अडचण आहे. न्यायालयाने पीओपीच्या सर्व प्रकारच्या मूर्तींवर बंदी घातली असल्याने शेखरसिंह यांनी जिल्ह्यातील कारागिरांना पाच जुलैपर्यंत पीओपी मूर्ती विकण्याची मुभा दिली होती. मात्र सहा जुलैपासून पीओपी मूर्त्यांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून यापुढे जर असे विक्री करणारे कारागीर आढळले तर त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

मातीकाम करणारा कारागीर दिवसाला दोन ते तीन मूर्ती बनवतो आणि पीओपी च्या साच्यातून दिवसाला पंचवीस ते तीस मूर्ती तयार होतात. शाडू मातीची एक फुटाची मूर्ती 850 ते 1500 रुपयांना विकली जाते की या मूर्तीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. मात्र पीओपीची मूर्ती ही साधारण 350 ते 850 या दरम्यान विकली जाते. पीओपीमध्ये केमिकल युक्त रंग असल्यामुळे जलप्रदूषण होते आणि पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत खराब होतात. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या मूर्तींवर बंदी घातली आहे. सातारा जिल्ह्यात परप्रांतीय कारागिरांकडून मोठ्या प्रमाणावर पीओपी मूर्ती घडवल्या जात आहेत. विशेषता बॉम्बे रेस्टॉरंट चौक, माहुली, महागाव तसेच संगम माहुली येथे रस्त्याच्या कडेला शेडमध्ये पीओपीच्या मुर्त्या बनवणाऱ्या अनेक कारागीरांनी पथारी मांडली आहे. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. कारागिरांच्या जवळपास सर्व मूर्तींची विक्री झाली तरी मूर्ती शिल्लक राहिल्याचे भासवून या वर्षी नवीन मूर्ती बनवण्याचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. अशा परप्रांतीय कारागिरांवर जिल्हा प्रशासनाला कोणतेही अंकुश असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.


Back to top button
Don`t copy text!