स्थैर्य, फलटण, दि. १६: फलटण शहरामध्ये विविध ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप व फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांच्यापथकाने कारवाई केलेली आहे. आगामी संचारबंदीच्या काळामध्ये विनाकारण कोणीही बाहेर फिरताना आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे संकेत प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिलेले आहेत.
फलटण शहरामध्ये जिंती नाका, नाना पाटील चौक व पृथ्वी चौक येथे फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप व पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी तिन्ही ठिकाणी विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाई केली तर विनामास्क फिरणाऱ्या १४ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली.
फलटण शहरातील अत्यावश्यक सेवेतील काही दुकाने ही वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्यामुळे सदर दुकाने ही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप व पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी सिल केली. फलटण तालुक्यातील नागरिकांनी आगामी काळामध्ये कोरोनाचे सर्व नियमांच्या पालन करावे व गरज असेल तरच घराबाहेर पडावे. विनाकारण बाहेर फिरणार्यांवर आगामी काळामध्ये कडक कारवाई करण्यात येणार आहे. या सोबतच अत्यावश्यक सेवेतील व्यापार्यांनी जर वेळेपेक्षा जास्त वेळ आपले व्यवसाय सुरू ठेवले तर त्यांची अस्थाना ही सिल करण्यात येईल, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.