स्थैर्य, सातारा, दि. ०३ : सातारा शहरात मागील तीन महिन्यात प्रथमच एकाच दिवशी दोन स्थानिक नागरिकांचा करोना मुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे .त्याशिवाय या आजाराच्या बाधितांच्या आधी काही वाढत चालल्याने अधिकच भिती वाढली आहे . करोना आजाराची साखळी तोडण्या बरोबरच बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी सातारा पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत .त्यामुळे आज शुक्रवारपासून सातारा शहरात होणारी रस्त्यावरील भाजी आणि फळ विक्री बंद करण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.
मागील आठ दिवसांपासून सातारा जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढ रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र दिसत असली तरी मागील आठ दिवसात जिल्ह्यातील रुग्ण संख्येने हजारांचा टप्पा पार केला असून सध्या ही संख्या बाराशे च्या घरात पोहोचली आहे. पालिकेने केलेल्या योग्य नियोजनामुळे मागील तीन महिन्यात शहरात केवळ 25 लोकांना करोना ची बाधा झाली होती. त्यापैकी बहुतांश रुग्ण हे मुंबई पुण्यातून आले होते.
काल गुरुवार पेठेतील एक महिला व रविवार पेठेतील एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली .या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा अधिक सज्ज झाली असून आता पालिकेकडून पुढील 14 दिवस सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या रविवार पेठ भाजी मंडई व शाहूनगर येथील इमारतीतील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. हा परिसर बांबू आणि बॅरिकेड्स लावून सील करण्यात आला आहे .अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यात येणार असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवरील इतर कोणालाही या परिसरात प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. सध्या या परिसरात सोडियम क्लोराइड द्वारे निर्जंतुकीकरण मोहीम राबवली जात आहे. दरम्यान भाजी आणि फळे विकताना घरपोच भाजी विक्री करता येईल मात्र रस्त्यावर बसून कोणीही व्यवसाय करू नये असे करताना जर कोणी आढळल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे.