स्थैर्य, मुंबई, दि. 2 : व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय) या आशियातील प्रीमिअर फिल्म, कम्युनिकेशन अॅण्ड क्रीएटिव्ह आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे डिज्नी +हॉटस्टार या भारतातील सर्वात मोठ्या ओटीटी स्ट्रीमिंग व्यासपीठाच्या सहकार्याने डब्ल्यूडब्ल्यूआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मनोरंजक आणि विचारप्रवर्तक शॉर्ट फिल्म्स प्रेक्षकांसाठी डिज्नी +हॉटस्टारवर स्ट्रीम केल्या जाणार आहेत.
विविध विषय आणि प्रकारांचा समावेश असलेल्या या शॉर्ट फिल्म्समध्ये अनेक सिनेमांचा समावेश आहे. जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिवल २०१८मध्ये द परफेक्ट १० पुरस्कार मिळवणारा मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यावर बेतलेला वेगवान नाट्यमय अलाक्षा, अत्यंत वैयक्तिक धक्क्यातून सावरणाऱ्या मुलीचा कथा असलेला २०१४ मधील स्पोर्ट्स ड्रामा हूप डायरीज, रवींद्रनाथ टागोरांच्या ‘द पोस्टमास्टर’ या कथेवर आधारित, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०१५ मध्ये बेस्ट स्क्रीनप्ले पुरस्काराचा मानकरी ठरलेला मनोरथ अशा काही सिनेमांचा यात समावेश आहे.
डिज्नी + हॉटस्टारवर सध्या उपलब्ध असलेल्या सिनेमांमध्ये फिल्म सिटी, कांचे, आलाव आणि ५०० रुपए या सात पुरस्कारप्राप्त, ६.५ दशलक्ष यूट्युब व्ह्यूज आणि फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळालेल्या सिनेमांचा समावेश आहे.
डब्ल्यूडब्ल्यूआयच्या अध्यक्ष मेघना घई पुरी म्हणाल्या, “व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलला डिज्नी + हॉटस्टारसोबत सहकार्याची घोषणा करताना अत्यंत अभिमान वाटत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतभरातील प्रेक्षकांना आमच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक सिनेमे पाहता येतील. या उदयोन्मुख फिल्ममेकर्सना त्यांचे काम सगळ्यांसमोर आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देताना पुढच्या पिढीतील कलाकारांना त्यांच्या स्वप्नाचा वेध घेण्याची प्रेरणा आम्ही देऊ आणि डू व्हॉय यू लव्ह (जे आवडते ते करा) हे संस्थेचे तत्व जपले जाण्याची आम्ही आशा करतो.”