मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त फलटण येथे नवोदित लेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । फलटण । महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त फलटण येथे एकदिवसीय ‘नवोदित लेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती, साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशनचे अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

कार्यशाळेबाबत सविस्तर माहिती देताना ताराचंद्र आवळे यांनी सांगितले की, ही कार्यशाळा रविवार, दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 4:30 या वेळेत फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यशाळेचे उद्घाटन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ भुषवणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, मांडवे येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम.डी.ढोबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळेच्या दुसर्‍या सत्रात ‘अभिजात मराठी’ या विषयावर डी.पी.भोसले कॉलेज, कोरेगावचे पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाळासाहेब चव्हाण मार्गदर्शन करणार असून यावेळी पांगरी येथील गुरुकृपा कृषि विकास व शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ.अजित दडस व महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचाय शांताराम आवटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यशाळेच्या तिसर्‍या सत्रात ‘नवोदित लेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा’ या विषयावर पुणे येथील ज्येष्ठ कथालेखक डॉ.जयवंत अवघडे मार्गदर्शन करणार असून फलटण येथील ज्येष्ठ कथालेखक सुरेश शिंदे, कथाकथनकार शत्रुघ्न जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळेचा समारोप महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे माजी अध्यक्ष प्राचार्य रविंद्र येवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने होणार असून यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सदरचा कार्यक्रम कोवीड 19 संबंधींचे नियम पाळून 50 लोकांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे, साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशनच्यावतीने उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, सचिव राजेश पाटोळे, खजिनदार आबा आवळे, सदस्य सौ.सुरेखा आवळे, दत्तात्रय खरात, सौ.चैताली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!