
दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२३ | फलटण |
राजाळे (ता. फलटण) गावातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जानाईदेवी मंदिरात मंगळवारी (धूलिवंदनादिवशी) गावातील काही ग्रामस्थांनी घरातील जीर्ण झालेल्या देवी-देवतांच्या मूर्ती, फोटो, टाक अशा शंभराहून अधिक मूर्ती ठेवलेल्या होत्या. या सर्व देवी-देवतांच्या मूर्तींची होत असलेली विटंबना गावातील कला, क्रीडा व सांस्कृतिक मंचच्या सदस्यांना पाहवली नाही. त्यामुळे त्यांनी त्या सर्व मूर्तींची विधीवत पूजा करून त्या सर्व मूर्ती, फोटो, टाक पंढरपूर येथील चंद्रभागा नदीमध्ये विसर्जित केले.
याप्रसंगी राजाळे येथील श्री. निळकंठ निंबाळकर, उदयसिंह निंबाळकर, संदिप जगताप, राहुल शेडगे, सुरेश बागल, विक्रम काकडे, मुरलीधर निगडे आदी सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यापुढे गावातील सर्वांनी मंदिराभोवती आपल्या घरातील देव-देवता यांचे फोटो, मूर्ती, टाक ठेवू नयेत, असे आवाहन गावातील ग्रामस्थांनी केले आहे.