‘विठाई’ बसवरील श्री विठ्ठलाच्या चित्राची होत असलेली विटंबना थांबवा !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । फलटण । शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात आरंभ करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा’ची ‘विठाई’ बससेवा लोकप्रिय झाली आणि तिचा राज्यभरात विस्तार करण्यात आला. विठुमाऊलीच्या नावे आरंभ करण्यात आलेली ही बससेवा स्तुत्यच असून या माध्यमातून शासनाने वारकर्यांच्या श्रद्धांचा सन्मान केला आहे; मात्र काही दिवसांनी या बसच्या बाहेरील भागात असलेल्या विठ्ठलाच्या चित्रावरील धूळ, थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग दिसू लागले, ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे. अनावधानाने का होईना, श्री विठ्ठलाची प्रतिमा मलिन होत आहे. हा श्री विठ्ठलाचा अनादर असून ही होत असलेली विटंबना रोखण्यासाठी ‘विठाई’ बसच्या बाहेर असलेले श्रीविठ्ठलाचे चित्र त्वरित काढावे, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. यावर उपाय म्हणून श्री विठ्ठलाचे चित्र प्रत्येक बसच्या आतील बाजूस लावून प्रतिदिन त्या चित्राचे पूजन करून त्याचे पावित्र्य राखावे, अशी विनंतीवजा सूचनाही समितीने केली असल्याची माहिती, समितीचे राज्यसंघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

या संदर्भातील निवेदन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन सचिव, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे, बसमधील प्रवासी हे मुद्दाम ही विटंबना करत नाहीत. अनावधानाने का होईना, खिडकीतून बाहेर थुंकणे, चूळ भरणे, तोंड धुणे, उलटी करणे आदी कृत्ये करतांना ती विठुरायाच्या चित्रावर त्याचे शिंतोडे उडतात. तसेच सध्या पावसाळा असल्याने अनेकदा रस्त्यावरील चिखल विठुरायावर उडतो. प्रतिदिन ज्या विठ्ठलाला पुजतो, त्याला घाणीने माखलेला पहाणे, हे अतिशय वेदनादायी आहे.

अध्यात्म शास्त्रानुसार, ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, म्हणजेच ‘जेथे देवतेचे नाव आणि रूप (अर्थात चित्र) आहे, तेथे देवतेची शक्ती कार्यरत असते (अर्थात प्रत्यक्ष देवताच असते)’ यानुसार जेथे श्री विठ्ठलाचे चित्र आहे, तेथे साक्षात् आपली विठुमाऊली असतेच; म्हणून ‘विठाई’ बसच्या बाहेर असलेल्या श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची विटंबना तत्काळ थांबवायला हवी, असे विनंतीपूर्वक आवाहन समितीने केले असल्याचे, घनवट यांनी सांगितले.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!