स्थैर्य, मुंबई, दि.18 : प्रसारमाध्यमे ही निपक्षपाती असावीत. पत्रकारांनी वार्तांकन करताना एकांगीपणे लिखाण केले तर त्या बातम्या फारशा वाचल्या जात नाहीत. बातमीमधून घटनेच्या दोन्ही बाजू समोर येणे लोकांना अपेक्षित असते. माहिती व तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे आज प्रसारमाध्यमांमध्ये अमूलाग्र बदल होत होत असून काळानुरुप अद्ययावत राहणे हे मोठे आव्हान प्रसारमाध्यमांसमोर निर्माण झाले आहे. फलटणसारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून प्रकाशित होणार्या दैनिक स्थैर्यने वाचकांना वृत्तसेवा देताना बातम्यांची नितीमुल्ये पहिल्यापासूनच जपली आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचे आव्हान पेलून डिजीटल मिडीयामध्ये देखील ‘स्थैर्य’ अग्रेसर ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
दैनिक स्थैर्यच्या अँड्रॉईड न्यूज अॅपचा शुभारंभ ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज विधानभवन येथील सभापती दालनात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
‘स्थैर्य’च्या वाटचालीबाबत बोलताना ना.श्रीमंत रामराजे म्हणाले, ‘स्थैर्य’ चे संस्थापक स्व.दिलीप रुद्रभटे यांनी फलटणमधून वृत्तपत्र सुरु केले. साधनांच्या कमतरतेमुळे पत्रकारितेतील तो काळ कठीण होता. अनंत स्थित्यंतरे पाहिल्यानंतर देखील सातारा जिल्ह्यातील फलटण या निमशहरी भागातून ‘स्थैर्य’ची वृत्तसेवा अखंडितपणे सुरु आहे. माध्यमं बदलली तरी वृत्तसेवा देण्याचे कार्य ‘स्थैर्य’ने गत 20 वर्षात खंडित केलेले नाही. सुरुवातीच्या काळात साप्ताहिक, द्विसाप्ताहिक, सायं – दैनिक तद्नंतर दैनिक अशा विविध माध्यमातून रुद्रभटे परिवाराने वृत्तसेवा देण्याचे काम अहोरात्र सुरुच ठेवले आहे. आज तंत्रज्ञानाची फार मोठी क्रांती आपण सर्वचजण अनुभवत आहोत. प्रसारमाध्यम क्षेत्रातही या क्रांतीमुळे अनेक बदल झालेले आहेत. डिजीटल मिडीयाने अल्पावधीत माध्यमक्षेत्र मोठ्या प्रमाणावर व्यापून टाकले आहे. त्यामुळे ‘स्थैर्य’ ने देखील डिजीटल मिडीयामध्ये पदार्पण करुन सुरुवातीला वेब पोर्टल आणि आता अँड्रॉईड न्यूज अॅप्लिकेशन तयार केले आहे हे कौतुकास्पद असल्याचे सांगून ना.श्रीमंत रामराजे यांनी ‘स्थैर्य’ च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी ‘स्थैर्य’चे संपादक प्रसन्न रुद्रभटे यांनी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत करुन अँड्राईड अॅप्लीकेशनबाबत माहिती दिली. प्रास्ताविक सुभाष भांबुरे यांनी केले तर आभार चैतन्य रुद्रभटे यांनी मानले.
कार्यक्रमास संजय खानोलकर, फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे, तुषार नाईक निंबाळकर, महेश सुतार, शंतनु रुद्रभटे, अमित पंडित, अमोल नाळे उपस्थित होते.