दिगंबर आगवणेंची पाऊले राष्ट्रवादीच्या वाटेवर ?; आयुर कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनानंतर तालुक्यात कुजबूज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०५ : फलटण तालुक्याचे युवा नेते तथा आयुर उद्योग समूहाचे शिल्पकार दिगंबर आगवणे यांनी तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर आयुर उद्योग समुहाच्या माध्यमातून उभारलेल्या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. राजकारणात उतरल्यापासून तालुक्यात आजवर राष्ट्रवादीला तगडे आव्हान देणार्‍या दिगंबर आगवणे यांनी आपल्या या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते आयोजित केल्याचे पाहून अनेक जण आवाक झाले असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर दिगंबर आगवणे यांची पाऊले राष्ट्रवादीच्या वाटेवर तर नाहीत ना? अशी कुजबूज तालुक्यात सुरु झाली आहे.

आयुर उद्योग समूहाचे शिल्पकार व युवा नेते दिगंबर आगवणे यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयुर कोरोना केअर सेंटर सुरु केलेले आहे. आयुर कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन हे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते काल संपन्न झाले. यावेळी फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, तुषार नाईक निंबाळकर, साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विक्रम भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. आगवणे यांनी सुरु केलेले हे कोरोना केअर सेंटर त्यांच्या सामाजिक उपक्रमाचा भाग जरी असला तरी उद्घाटनास असलेली मान्यवरांची उपस्थिती तालुक्याच्या राजकारणातील भविष्यातील मोठे स्थित्यंतर दर्शवत असल्याचे अनेकजण बोलत आहेत.

युवा नेते दिगंबर आगवणे हे गत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापासून दूर जाण्यास सुरवात झालेली होती. त्यानंतर काही महिने त्यांनी नव्याने सुरु केलेल्या आयुर उद्योग समूहाकडे पूर्ण लक्ष दिले. विधानसभेची निवडणूक झाल्यावर दिगंबर आगवणे हे प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यांनी स्वतःचे साम्राज्य पुन्हा उभे करत आयुर उद्योग समूहाचे विविध उद्योग सुरु केलेले आहेत. त्यांची आयुर ऑल इन वन शॉपी हि संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारू लागलेली आहे. आता काही दिवसातच आयुर उद्योग समूह हा स्थानिक शेतकर्‍यांसाठी कृषी क्षेत्रात दमदार पाऊले देखील टाकणार आहे. या सर्व गोष्टी बघता व्यवसायात स्थिरस्थावर होत असलेले दिगंबर आगवणे राजकारणापासून पूर्णत: दूर गेले की काय? असा प्रश्‍न त्यांच्या कार्यकर्त्यांसह अनेकांच्या मनामध्ये उपस्थित राहत होता. परंतु आता दिगंबर आगवणे यांनी आपला व्यवसाय स्थिर करून पुन्हा आपली पावले राजकारणाच्या दिशेने वळवली असल्याचे चित्र सध्या तयार होत आहे.

गत महिन्यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांनी दिगंबर आगवणे यांच्या गिरवी येथील निवासस्थानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले होते कि, ‘‘दिगंबर आगवणे यांना कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही, ते सक्षम आहेत.’’ त्यामुळे दिगंबर आगवणे हे राजकरणात पुन्हा सक्रिय होणार हे त्यातून सूचित होत होते. मात्र आता आगामी काळात आजवरची राजकीय वाट सोडून ते वेगळी वाट स्विकारण्याच्या तयारीत आहेत की काय? असा कयास कालच्या कार्यक्रमावरुन लावला जात आहे.

दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर ‘स्थैर्य’ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, ‘‘सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. कोरोनावर उपचार करण्यासाठी फलटण तालुक्यामध्ये सेवा व सुविधा पुरवण्यासाठी जो कोणीही पुढे येईल त्याला आमचे संपूर्ण सहकार्य राहील. कोरोना परिस्थितीचे गांभीर्य आता नागरिकांनी ओळखणे गरजेचे आहे’’, असे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगून कोणतेही राजकीय विधान करण्याचे टाळले.

तर दिगंबर आगवणे यांनी देखील ‘स्थैर्य’ कडे आपली प्रतिक्रिया देताना, ‘‘सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाने रौद्र रूप धारण केलेले आहे. अशा काळामध्ये तालुक्यामधील सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण हे आपण सर्व जण करतच असतो परंतु कोरोनासारख्या महाभयंकर संकटामध्ये तालुक्यामधील सर्वसामान्य जनतेला वाचवण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे’’, असे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!