मोकाट फिरणारे मोकळे आणि कारवाईचा बडगा शेतकऱ्यांवर


स्थैर्य, लोणंद, दि.०५: लोणंद शहरात सध्या पोलिस व प्रशासनाच्या वतीने कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी चालू आहे. मात्र याचा फटका सकाळच्या वेळी भाजीपाला व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत असल्याने  दिसून येत आहे.

सातारा जिल्ह्यासह लोणंद शहरात वाढत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांनी कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. यामुळे घरपोच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद करण्यात आले आहेत. मात्र या निर्णयाचा फटका लोणंद परिसरातील शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याला दुग्ध व्यवसाय आणि भाजीपाला या दोन्ही नाशवंत मालाला ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे. सकाळीच्या वेळी घरोघरी दूधाचे रतीब घालणारे शेतकरी पोलिसांच्या अडवणूकीमुळे संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या महामारीत आधीच शेतमालाला भाव नसल्याने संकटात सापडलेला शेतकरी यामुळे पुरता हतबल झालेला आहे. याउलट अकरा वाजल्यापासून पोलिसांचा बंदोबस्त तेवढा कडक नसल्याने मोकाट फिरणारांना मात्र मोकळे रान मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे फक्त नावालाच पोलिस कारवाई चालू आहे की काय हा प्रश्न शेतकऱ्यांसह लोणंदकरांना पडला आहे.

म्हस्कूआण्णा शेळके (माजी सैनिक/दूध उत्पादक शेतकरी) :-

प्रशासनाने शेतकऱ्याचे नुकसान टाळण्यासाठी पर्याय शोधला पाहीजे. दूधासारखा पदार्थ शेतकरी अधिक काळ ठेवू शकत नाही. सध्या लोणंद मधील अनेक नागरीक शेतकऱ्यांकडून थेट रतीबाचे दूध खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांना पोलिसांनी केलेल्या नाकेबंदीमुळे सध्या दूध घालणं शक्य होत नाही. त्यांच्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवकांमार्फत दूध आणि भाजीपाला एका ठिकाणी संकलित करून वितरणाची व्यवस्था करण्याची गरज आहे.

पोलीसांचा कारवाईचा फार्स सकाळी 7 ते 11
दुग्ध विक्रेते, शेतकरी, एमआयडीसीतील कामावर जाणारा कामगारवर्ग, यांचेवर कारवाई करून पोलीस प्रशासन अन्याय करत आहे.
कारवाई करायची तर सकाळपासून सायंकाळपर्यंत मोकाट फिरणारे यांचेवर काहीच कारवाई होताना दिसत नाही.
या कोविडच्या काळात सर्वसामान्य नागरिक, शेतकरीवर्ग अगोदरच खचलेला असताना या नाहक कारवाईचा बळी ठरत आहे. प्रशासनाने याचा जाणीवपूर्वक विचार करावा


Back to top button
Don`t copy text!